Showing posts with label गझलसदृष कविता. Show all posts
Showing posts with label गझलसदृष कविता. Show all posts

Tuesday, August 10, 2010

आभारी वेदनांचा ...

कंटक सारे आठवांचे श्वासात सखे रुतलेले
कांगावे अन स्वप्नांचे.., आकांक्षात गुंतलेले…….

काळ ओलांडूनी मागे दिवस जुने फिरलेले
बोभाटे ओल्या स्मृतींचे अश्रुंनी ते मिरवलेले ….

श्वासही भ्रष्टाचारी माझे तुजसवेच बांधलेले
लगाम वेड्या मनाचे मज हातातून सुटलेले….

मी आभारी वेदनांचा मज तयांनी सावरलेले
तटबंदीचे कोट मनाच्या भोवती मी बांधलेले….

नको दिलासे चांदण्याचे उजेडात बरबटलेले
मळलेले बिंब प्रकाशाचे.., अंधार उजळू लागले…..

विशाल.

राम

अताशा मनाच्या पसार्‍यात राम नाही,
बहाणे मनाचे…, दिलाशात राम नाही !

सुखाचे जरी हे पुरावे हजार हाती,
मनाला कसा तो भुलाव्यात राम नाही !

इशारे फुलांचे…., अता भूलणार नाही,
फुलांच्या मनी राहिला आज राम नाही !

कशाला हवे चंद्र.., तार्‍यांचे चांदणेही,
अता चांदण्यांच्या लकाकीत राम नाही !

हसावे, रडावे, मना त्यात गुंतवावे,
उसासे फुकाचे.., खुलाशांत राम नाही !

विशाल.

Tuesday, August 3, 2010

तुझ्या विना ...!

क्षण एक हा जरासे आज हसून घेईन म्हणतो
हसता हसता नकळत थोडे, रडून घेईन म्हणतो…!

सुख-दु:खाच्या फूटपट्टीचे निकष लावुनी आयुष्या
सरणावर जाण्यापूर्वी, थोडे जगून घेईन म्हणतो…!

आयुष्याच्या या रंगपटावर खोटे खोटे जगताना
फसवुनी सत्यास, स्वप्नात रंगून घेईन म्हणतो…!

गेले ते दिन गेले सये तव सहवासाचे सोनसळी
साजिरे तव सहवासाचे, क्षण गुंफून घेईन म्हणतो…!

हा प्रवास युगा युगांचा तुजवीण नको नकोसा
तव आठवणींना सार्‍या, संगे बांधून घेईन म्हणतो…!

विशाल

रात्र मिलनाची ...!

मंद वार्‍यात,धूंद तार्‍यात, लाजत रात्र आली
चांदण्यांचे तबक हाती, उधळीत रात्र आली !

मंदावला भास्कर.., चांदणे सावळे निळावले
स्पर्षाने शशिकराच्या, बघ गरती रात्र झाली !

शृंगारात विरघळे, अस्तमानाचे गीत फिके
लाजलेली रातराणी…, फुलवीत रात्र आली !

लज्जेने धरले हळुवार, दाती शेव अंधाराचे
गुंफीत गीत मिलनाचे.., आतूर रात्र झाली !

नको रे सख्या हे असे, अता दुरावे अंतरीचे
रुणझुणते सुर समीराचे, धुंदीत रात्र आली !

चल मिळून तनुत, आगळा देहराग आळवू
मिटले अंतर सगळे…,अन गंधीत रात्र झाली !

विशाल.

माज ...

उजळलेला अंधार आणि चांदणे डागाळलेले
माज मला आयुष्याचा, असे जरी दृष्टावलेले !

बघ पोसतो अहंकार…., दारिद्र्याचा सुखाने
दशावतार आयुष्याचे, मी अहंकारे झाकलेले !

कसे चांदणे पुनवेचे, हलकेच अंधारात बुडाले
साम्राज्य हे तिमीराचे, अन तारेही मातलेले !

उदासवाणे सखे चांदणे, गातो गाणे अंधाराचे
चंद्र बापुडा केविलवाणा, नभ ही कळवळलेले !

असेच गाईन जीवनगाणे, जगेन आनंदाने
जिवनाचे सारीपाट, मीच कधीचे उधळलेले !

विशाल

Tuesday, July 27, 2010

आता नको…

भावनांचे पसारे खुप झाले
हे असे वेडावणे आता नको … !

वळणावर त्या रेंगाळलेल्या
आठवांची साथ आता नको … !

हृदयात तू कोंडलेल्या सखे
सुखांचा गुदमर आता नको … !

चल सखे स्वप्न स्वप्न खेळु
वास्तवाचा धाक आता नको … !

हरवले स्वर ते सारे आता
हुरहुर मारव्याची आता नको … !

त्या तिथे पलिकडे .., ते चित्र
फसव्या सुखाचे आता नको … !

चल सखे पैलतीरी जावू
मोह ऐलतीराचा आता नको … !

विशाल

निरोप…

कसा आज मोगरीने डाव साधला
सुन्न ओझे आठवांचे घाव घातला..

सुटे भान दिशाहिन आज जाहलो
सापडेना मार्ग माझा चांद मातला..

हरवले माझे पण तुला पाहता
आसवांनी दोर माझा आज कापला..

संपले ते स्वप्न सारे सत्य जाणता
भुतकाळ रम्य सारा आज बाटला..

हंसलीस खिन्न सखे ओठ दाबुनी
आसवांना लपविता भाव दाटला..

एकवार हास पुन्हा ओठ दुमडुनी
अजुनही त्यात माझा श्वास गुंतला..!

विशाल.

असे धर्म प्रीतीचे बाटले, किती ?

 
मला सांग आभाळ फाटले, किती ?
तुझे ही अश्रू आज आटले, किती ?
 
दिशाहीन वारे फोफावले असे
दिशांनीच वार्‍याला छाटले, किती ?

सुक्या भावनांनी ओलावले मना
मुके दोर मी पुन्हा काटले, किती ?

जुन्या आठवांनी वेडावले अता
तुझे भाव आभासी दाटले, किती ?

कशाला हवी वेड्या यातना नवी
पसारे जखमांचे साठले, किती ?

नको राग प्रीतीचा बाळगू असा
असे धर्म प्रीतीचे बाटले, किती ?

विशाल.