Tuesday, January 18, 2011

नकार...

उगाच खोटे हसून वेडा ठरावयाला नकार आहे
तुझ्याविना या जगात माझा जगावयाला नकार आहे

तिला जरासा हवा दुरावा, तिला जरासा हवा अबोला
कधी असे वाटते, कळीचा फुलावयाला नकार आहे

नको बहाणे, नको निमित्ते, खरेपणा भावतो मनाला
फसून का मी उगी रहावे? फसावयाला नकार आहे

क्षणात आसू, क्षणात हासू, असे कसे वागणे सखीचे?
तिने फुलावे, तिने हसावे, रुसावयाला नकार आहे

सुखात मी पाहतो तुला, तू तुझे दु:ख दे मलाच राणी,
तुझ्याविना या सुखासवे मी असावयाला नकार आहे

मलाच का दु:ख कोवळे हे जपावयाचा विकार आहे (?)
विशाल, दु:खे तुझी, सुखाला स्मरावयाला नकार आहे

वृत्त : हिरण्यकेशी
लगावली : लगालगागा लगालगागा लगालगागा लगालगागा
अर्थात या गझलेच्या जडणघडणीत क्रांतीताईचे अनमोल मार्गदर्शन आणि सटीप कानऊघाडणी यांचा सिंहाचा सॉरी सिंहीणीचा वाटा आहे ;)

No comments:

Post a Comment