Tuesday, April 5, 2011

अंतरीचा ध्यास तू होशील का?


*********************************

घेतलेला श्वास तू होशील का?
आठवांचा 'व्यास' तू होशील का?

सोडुनी गेले जिवाचे यारही...
आज माझा खास तू होशील का?

वास्तवाचे दु:ख सारे भोगले
कल्पनेचा भास तू होशील का?

भौतिकाचे बंध आता तोडले,
पारलौकिक आस तू होशील का?

खेळ माझ्या वाटणीचे खेळलो
सावळ्याचा 'रास' तू होशील का?

वेदनांशी झुंजलो आहे सदा...
संपणारा श्वास तू होशील का?

सत्य व्हावे स्वप्न माझे राघवा
अंतरीचा ध्यास तू होशील का?


*********************************
वृत्त : मेनका
लगावली : गालगागा गालगागा गालगा

विशाल...

No comments:

Post a Comment