Friday, September 30, 2011

लेक लाडकी ...

थोबडापुस्तकावरील ’मराठी कविता’ गृपच्या ’लेक लाडकी’ या विषयांतर्गत लिहीलेली कविता

कधी भासते ती फुलराणी
गाते सदा आनंदगाणी
जीवनी आली ही मधुराणी
लेक लाडकी या बापाची !

गालावरती खळी मनोहर
लट रेंगाळे भाळी सुंदर
अधुरी तिजवीण जिवनगाणी
भेट आगळी परमेशाची !

लटके करशी किती बहाणे?
क्षणात रुसणे, हळुच रडणे
क्षणी हासते बाळ शहाणी
ठेव अनोखी मातपित्याची !

कधी हळुच ती कुशीत येते
हलकेच माझे अश्रु पुसते
लेक लाडकी तुझी शहाणी
नसे कुणाची, मी बाबाची !

तिला न ठावे त्रागा करणे
आवडे न तिज उगाच फ़ुगणे
माय-बाप सांगती कहाणी
दैवे दिधल्या वरदानाची !

हवी कुणाला मग तुप-रोटी
कुणा हवी श्रीमंती खोटी?
मुलगी समृद्धीची 'खाणी'
पुण्याई जणु गतजन्मीची !

विशाल

2 comments:

  1. कविराज सुंदर... निव्वळ अप्रतिम !!

    एक पोस्ट लिहितोय, त्यासाठी ही कविता साभार मागण्यात येईल :) :)

    ReplyDelete
  2. आपलीच आहे प्रभो ! आता मागण्याची आवश्यकता नसावी ! आभार्स :)

    ReplyDelete