Wednesday, June 6, 2012

सोबत


आलास रे...
दिल्या वचनाला जागलास मित्रा !
अजुनही आठवतोय मला एकेक शब्द
तुझ्या त्या नि:शब्द, मौन निरोपातला
म्हणाला होतास तू मला...

येइन रे परत
काळजी कशाला करतोस?

मलाही कधी कधी कंटाळा येतो शाळेचा
रोज रोज आभाळात शिस्तीत
रांग लावून उभा राहण्याचा
मग मी हळूच मास्तरांची नजर चुकवतो
आणि रांग मोडून बाजुला सटकतो
माझ्याबरोबर माझ्याचसारख्या
इतरही काही चुकार पोरांना घेवून
वसुधेचं भव्य मैदान गाठतो
तुझ्यासारख्या आतुरतेने वाट पाहणार्‍या
जिवलग मित्रांसमवेत दंगा करायला

ह्म्म्म्म...
किती दिवस वाट पाहतोय माहिती?
वेड्या चातकासारखा...
पण आलास तू...
आता चांगला ३-४ महिने रहा..
तुप-रोटी खा, मस्त दंगा करू

आणि मग वाटलंच तर...
जाशील बापडा परत
आभाळबाबाच्या शाळेत...
पुढच्या पावसाळ्यापर्यंत आम्हाला
नक्की पुरेल त्या ओल्या आठवणींची सोबत !

विशाल

1 comment: