Friday, March 7, 2014

तुझे मजवरी भाळणे ते अवेळी


तुझे लाघवी बोलणे ते अवेळी
तुझे विभ्रमी हासणे ते अवेळी

जसे पावसाचे अकाली बरसणे
तुझे आर्जवी वागणे ते अवेळी

लपे चंद्र मेघांमध्ये मत्सराने
तुझे मुक्त तेजाळणे ते अवेळी

सखे आप्त एकांत हा फक्त माझा
तुझे मजवरी भाळणे ते अवेळी

नको मोक्ष, स्वर्गात जागा नको ती
तुझे स्पर्शही भासणे ते अवेळी

मिटे आसही या क्षणी ऐहिकाची
तुझे मंद घोटाळणे ते अवेळी

लगावली : लगागा लगागा लगागा लगागा
वृत्त : भुजंगप्रयात

विशाल  

No comments:

Post a Comment