Wednesday, November 19, 2014

किती राहिले श्वास देहात बाकी ?

***********************************

किती वाकुडे बोल बोलून झाले
स्वत:च्याच सत्वास गाळून झाले

धरा सांगताहे कथा पावसाची
किती थेंब पदरात झेलून झाले ?

जरी भोवती 'माणसे' फार झाली
तरी एकट्यानेच 'खेळून' झाले

नको रोकडा, दागिनेही नकोसे
बियाण्यासवे सत्व तोलून झाले

जमावा कसा नाच मोरा प्रमाणे ?
चकोरापरी प्राण उधळून झाले

कसा रे मुरारी तुझा हा अबोला?
सुरांवर तुझ्या आज भाळून झाले

'बळीच्या घरी सौख्य नांदो सदाचे'
पुन्हा आरशालाच टाळून झाले

किती राहिले श्वास देहात बाकी ?
'प्रभो' रे किती डाव खेळून झाले ?

***********************************
विशाल

No comments:

Post a Comment