Tuesday, April 11, 2017

शब्दतुला

शब्दतुला

बहरून येती अलगद कधी मनीचे भाव अनामिक
निःशब्द होती ओठ कधी मौनाच्या लाख त-हा
मनपाखरू शोधत फिरते मौनाच्या अन शब्दकळा
सगळेच कसे गं उलगडुनी सांगायाचे सांग तुला?

कधी अचानक येई भरते झरतो हलके शब्दझरा
हळवी होते कधी कविता बांध फोडुनी अस्तित्वाचा
कधी घुटमळते ओठी, मौनाची होऊन चंद्रकला
कधी मनाच्या उंबरठ्यावर झुलत राहते मौनझुला

या डोळ्यातून स्वप्न तुझे हातात लाजरा हात तुझा
क्षुब्धता कधी, कधी तृप्तता, आवेग अन मिलनाचा
काय-काय अन कसे किती सांगायाचे सांग तुला?
मन होई बावरे झुलताना स्वप्नांचा तो चांदणझुला

तू लाजून हंसता गाली, जीव होतसे अधीर असा
या जगण्याचे होते अत्तर मृदगंधही होतसे फिका
मी सांगत फिरतो पाना-पाना ऐक तूही प्रितफुला
या हंसण्याखातर केली होती स्वप्नांची मी शब्दतुला

© विशाल कुलकर्णी
१२-०४-२०१७

No comments:

Post a Comment