Monday, January 21, 2019

निरोप
पैलघंटा किणकिणु लागली काठावरती गर्दी जमली,
अखेरचा तो निरोप घेण्या आठवणींची झुंबड उडली.

साद तिकडची कानी आली खग बावरले लाट थांबली,
गाडी सुटली शिटी वाजली जिवाशिवाची झूल उतरली.

कोण प्रवासी कुठे चालला, इथे कुणाचा प्रवास सरला?
निघे पालखी पुढल्या गावा या ठाण्यातील डेरा उठला.

मंदिर पडके नदी किनारी स्तब्ध जाहल्या अशांत लहरी
पिण्डीपुढचा उदास नंदी, देव विरघले कुण्या अंबरी?

कितीक उरले क्षण मोहाचे किती राहिल्या आर्त वेदना
क्षणात एका सरली माया मुक्तीचीही नसे वासना

चिंधीवर देहाच्या जड़ते प्रेम अनामिक आणि चिरंतन
तुटता माया सुटते बन्धन आत्म्याचे हे सत्य सनातन

अखेरचा तो निरोप येता लगबग होते मग श्वासांची
पैलतिराचा ध्यास लागतो ओढ़ लागते अज्ञाताची

जो जो येतो जाय परतुनी तरी जिवाला आस नेहमी,
जिवाशिवाची भेट घडावी, जा सुखे येण्यास परतुनी

© विशाल कुलकर्णी


No comments:

Post a Comment