Wednesday, July 30, 2025
कोहम
काल इथेच कुठेतरी जोन एलियाच्या दोन ओळी वाचण्यात आल्या...
"मुझसे मिलने आए हो?
बैठो, बुलाकर लाता हूं ..."
आणि झरकन आतापर्यंतचा सगळा प्रवास डोळ्यासमोरून फिरला. स्वप्नांचा पाठपुरावा करण्याच्या नादात स्वतःला भेटणं कधी कमी होत गेलं कळलंच नाही....
जे मनात आलं ते इथे मांडण्याचा प्रयत्न करतोय.
भेटण्या आलास मजला? ये बैस शेजारी
शोधतो आहे मीही, गेली कूठे स्वारी?
भेटलो नुकताच मजला केस विंचरताना,
धुसर झाला आरसा, रिक्त झाल्या तसबिरी
पाठीवर थोपटले माझ्या, म्हणालो मला
भेटत जा रे असाच मित्रा येता-जाताना
हळूच हसलो, हलकेच; दिली स्वतःला टाळी
वेळ नसे भेटाया, तू इच्छांचा हरकारी
ओळखीचे स्वर सगळे विखुरले वाऱ्यावरी
उगाच भटकशी कुठे? शोध स्वतःच्या अंतरी
© विशाल कुलकर्णी
Subscribe to:
Posts (Atom)