Monday, September 7, 2015

मोकळा आहे तरी ना मुक्त मी...



श्वास आहे घास नाही कोरडे नि:श्वास केवळ
भाकरीचा चंद्र नाही, चांदण्याचा भास केवळ

साव म्हणती, चोर म्हणती, ढोरही म्हणती कुणीसे
माणसाची जात माझी, दांभिकांचा फास केवळ

मिरग गेला हस्त गेला पांढरीला ओल नाही
धान नाही पेरणीला, पावसाची आस केवळ

प्राक्तनी सगळ्या जिवांच्या शेवटी मातीच आहे
मोह संपे ना तरीही, खेळ 'त्याचा' ख़ास केवळ

खोल नांदे जखम ओली वेदनेला अंत नाही
मोकळा आहे तरी ना मुक्त मी... आभास केवळ

अंतरीचा रामराया शोधसी का एकट्याने?
सोड आता नाद वेड्या, वेच थोड़े श्वास केवळ

विशाल ५/०९/२०१५

2 comments:

  1. प्राक्तनी सगळ्या जिवांच्या शेवटी मातीच आहे
    मोह संपे ना तरीही, खेळ 'त्याचा' ख़ास केवळ

    loved it!

    ReplyDelete