Thursday, December 17, 2015

हुरहुर

हुरहुर 

सावल्या झाकोळलेल्या बोलल्या वाऱ्यास हलके
जा उन्हाला सांग आता, थांब.. घे थोडा विसावा
पावले चालून थकली गाव अजुनी दूर माझा
सांग त्या रस्त्यासही घे श्वास वेड्या तू जरासा

सांजवेळी काहुर मनी, दाटती अवचीत डोळे
अंतरीचा शाम कोठे ? साद घाली हां दुरावा 
वेड कसले हे प्रियाचे क्षुब्ध करते विरहवेळा 
त्या तिरावर वाजताहे धुंद होवुन कृष्णपावा

ऐक आता थांब थोडे विरघती अंधारभूली 
मोहपट तो संभ्रमाचा त्यासवे मग विरघळावा
या क्षणांचे, त्या क्षणांशी मैत्र जुळता ते चिरंतन
स्पष्ट होता चित्र सारे पट सुखाचा उलगडावा

मोजके आयुष्य उरले राहिलेले श्वास थोड़े
पुर्णतेचा ध्यास का हों येथ स्वप्नांना नसावा ?
कोण येथे तृप्त, कोणा आस फुलण्याची नव्याने
एक हुरहुर, एक आशा, अर्थ जगण्याला मिळावा

विशाल 

No comments:

Post a Comment