Saturday, May 8, 2021

तेव्हाही ...


तुझ्या असण्याचे संदर्भ

पानोपानी आढळताहेत अजूनही

वहीभर विखुरलेली मोरपिसे

सापडत राहतात अजूनही...


प्रत्येक पाऊलखुणेपाशी ,

मी अडखळतो पुन्हा-पुन्हा

ते दिवस, ते क्षण आणि ...

अंगभर रुजलेले ते स्निग्ध स्पर्श

रोमांच म्हणू की शहारा 

पण मी उजळून निघतो अजूनही ...


जाते म्हणून निघालीस खरी

पण तुझ्या पदराचा शेव

माझ्या केसात अडकलेला

पुढे जाताना अगदी

मागे वळूनही पाहिले नाहीस खरे.

माझी नजर मात्र तुझ्या,

सावलीवर अडकलेली अजूनही ....


मी असेन अथवा नसेनही 

तू आहेस माझ्यातच गुरफटलेली

मनभर गोंदलेल्या तुझ्या पाऊलखुणा

ताज्या आहेत आणि राहतील ....

 तेव्हाही !


विशाल कुलकर्णी


No comments:

Post a Comment