बसंतचं लग्न

प्रस्तुत लेखमालिकेचे लेखक श्री. तात्या अभ्यंकर हे मिसळपाव डॉट कॉम या संस्थळाचे संस्थापक तसेच संचालक आहेत. पण ही त्यांची खरी ओळख नव्हेच मुळी. यापेक्षा तात्यांसारख्या दर्दी संगीतरसिका ला स्वतःला केवळ एक निस्सिम संगीतप्रेमी म्हणवुन घेणेच जास्त आवडेल. तात्यांना सुदैवाने खुप मोठ्या-मोठ्या संगीत सम्राटांचा सहवास लाभला आहे. उदा. स्व. सुधीर फडके उर्फ बाबुजी, स्व. फिरोजजी दस्तुर ई. या लेखमालेत तात्यांनी आपल्या हिंदुस्थानी राग संगीतातील राग - रागिण्यांमध्ये असलेले वैविध्य आणि तो राग त्यांना जसा भावला तसाच इथे मांडण्याचा प्रयत्न केला आहे. ही लेखमाला या आधी मनोगत, तसेच मिसळपाव या संस्थळावर प्रकाशित झालेली आहे.
माझी आणि श्री. तात्यांची प्रत्यक्ष ओळख, परिचय नसताना देखील त्यांनी उदार मनाने त्यांची ही लेखमाला मला माझ्या ब्लॉगवर प्रकाशित करायची अनुमती दिली याबद्दल मी त्यांचा शतशः आभारी आहे.
विशाल विजय कुलकर्णी.
चला वर्‍हाडी मंडळी, चला तर आता जावु या बसंतच्या लग्नाला !
बसंतचं लग्न..१ (ओळख)
नमस्कार मंडळी,
आपल्या हिंदुस्थानी रागदारी संगीतात बसंत हा एक मन उल्हासित करणारा राग. अनेक बडे बडे गवई हा राग आवडीने गातात. मंडळी, तसं पाहिलं तर आपल्याकडे हा राग ऋतुकालीन मानला जातो. नावावरुनच कळतं की हा खास वसंत ऋतुत गाण्याचा राग आहे. वसंत सुरू झाला की आपल्याला अनेक मैफ़लींतून बसंत ऐकायला मिळतो. बसंत-बहार, बसंती-केदार, धन-बसंती सारख्या जोड रागातसुद्धा हा राग खूप मौज आणतो.
मी एकदा सवाई गंधर्व महोत्सवात पं. जसराज यांचा बसंत ऐकला होता. जसराजजींनी बसंतची मस्तपैकी भट्टी जमवली होती. बसंतमधली एक फार सुरेख बंदिश ते गायले होते. तीचे शब्द असे होते,
"और राग सब बने बाराती,
दुल्हा राग बसंत!
मदन महोत्सव आज सखीरी,
बिदा भयो हेमंत...."!!!!!
क्या बात है! काय सुंदर कल्पना आहे पहा. आमच्या बसंतचं लग्नं! दुल्हा बसंत घोड्यावर बसला आहे आणि बाकी सगळे राग त्याचे बाराती!!! मंडळी किती सुरेख बंदिश आहे ही!
मग काय? माझ्या डोळ्यासमोर ती बारात साक्षात उभी राहिली. इतर कोणकोणते राग या वरातीला आले असतील बरं? मी माझ्या मनाशी सहज कल्पना करु लागलो आणि काही विचार माझ्या मनांत आले ते इथे मांडत आहे.
सर्वात प्रथम म्हणजे आपले यमन आणि भूप सर्वांत पुढे असतील या बारातीत. अत्यंत प्रसन्न व्यक्तिमत्व आहेत ही. यमन तर खुपच खुष असेल त्याच्या लाडक्या बसंतचं लग्न आहे म्हणून! आणि बरंका मंडळी, आपला यमन जितका प्रसन्न आहे तितकाच तो हळवाही आहे. नवऱ्यामुलाकडचा असुनही नवी नवरी सासरी जातांना पाहून त्याच्या डोळ्यात आनंदाश्रू येतील!
बसंतचं लग्न..२ (यमन, यमनकल्याण)

या बसंतचे खुप लाड केले आहेत बरं का यमनने. घरातल्या कोणी मोठ्या व्यक्तीने (मालकंस म्हणा किंवा दरबारी म्हणा!!) ओरडावं, आणि रुसलेल्या बसंतने यमनच्या कुशीत शिरावं, असंच नेहमी चालंत आलेलं आहे. यमन नेहमी प्रेमाने जवळच घेणार! ओरडणं, दुसऱ्याला लागेल असं बोलणं हे यमनला कधी जमलंच नाही.
मनांतला विवेक, दुसऱ्याला समजून घेण्याची भावना, आपलंही कुठे चुकलं असेल, किंवा चुकू शकेल हे तपासून पहाण्याची वृत्ती यमनच्या श्रवणाने नक्कीच वाढीस लागते. खरंच मंडळी, काय आणि किती लिहू यमन बद्दल! मी तर म्हणेन ज्याला यमन गाता आलां, त्याला गाणं आलं!! माणसातलं माणूसपण म्हणजे यमन!
या यमनला एक जुळा भाऊही आहे बरं का, त्याचं नांव यमनकल्याण! हा तर यमनपेक्षा काकणभर जास्तच तरंल आहे! नास्तिक मंडळींनी यमनकल्याण जरूर ऐकावा, त्यांना परमेश्वरी अस्तित्वाचा आणि आवाक्याचा थोडाफार तेरी अंदाज येईल!!
दोघा भावांच्या दिसण्यात तसा काहीच फरक नाही. यमनकल्याणच्या गालावंर शुद्ध मध्यमाचा एक लहानसा परंतु अत्यंत देखणा तींळ आहे एवढांच काय तो फरक. पण हा तींळ म्हणजे काय हे खरं सांगू का, कृष्णाचं मोरपींस आहे हो ते!!
मला तरी आत्तापर्यंत यमन आणि यमनकल्याण असेच दिसले. तुम्हाला कसे दिसले सांगाल का?
बाबुजींनी "दैवजांत दुःखे भरतां.." हे गाणं बांधतांना यमनकल्याणचा किती सुरेख उपयोग केला आहे. भरताला "मी निश्चितपणे पुढची १४ वर्षे परत येणार नाही, तू परत जा.." असं राम सांगतोय! रामही खूप हळवा झालेला आहे, पण त्याला विवेक तर सोडता येत नाहीये!! मग करायचं काय? मंडळी, यमनकल्याणची ताकद काय आहे ते इथे कळते!
"ज़रा मरण यातून सुटला कोण प्राणीजांत?दु;खमुक्त जगला का रे कुणी जीवनांत?वर्धमान ते ते चाले मार्ग रे क्षयाचा"!!
हे वास्तविक एक कटू सत्य! दुसऱ्या कुठल्या भाषेत ते ऐकायला आवडलं नसतं आपल्याला कदाचित! पण यमनकल्याणच्या भाषेंत पटलं की नाही लगेच?!!
एका विशिष्ठ पद्धतीने केली की कार्ल्याची भाजी मुळीच कडू लागत नाही असं म्हणतात!!!
बसंतचं लग्न..३ (भूप)
नमस्कार मंडळी,
तर आपण बसंतच्या लग्नाच्या वरातीबद्दल बोलत होतो. "दुल्हा" बसंत घोड्यावर बसला आहे, आणि इतर सगळे राग या वरातींत सहभागी झालेले आहेत. गेल्या लेखांत आपण त्या वरातीमधल्या यमन आणि यमनकल्याण या दोन रागांबद्दल बोललो.
आणखी कोण बरं आहे या वरातीमध्ये?(मध्ये= कर्टसी-वरदा!!;) अरे खरंच की, यमनच्या मागे तो कोण चाललांय? ओहोहो, अरे हा तर आपला भूप! भूप रागाबद्दल काय बोलायचं महाराजा? साक्षांत भूपच तो! तुम्हांला सांगतो मंडळी, अत्यंत गुणी स्वभावाचा राग आहे बरं का हा. गाणं शिकवतांना सुरवातीलाच यमन आणि भूप या सारखे राग शिकवले जातात. राग-संगीताच्या खजिन्याकडे वाटचाल करतांना प्रेमाने आपला हात धरतो तो भूप! भूपाचा हात धरूनच आपल्याला पुढे जायचं असतं. हा भूप आपली आयुष्यभर फार छान साथ करतो.
आपण पाहिलं की यमन प्रसन्न आणि हळवा आहे. पण भूपाचा मला सर्वांत प्रकर्षाने जाणवणारा स्वभाव म्हणजे हा अत्यंत "प्रेमळ"आहे! तुम्हांला सांगतो मंडळी, या आमच्या भूपासारखं प्रेमळ आणि कौतुक करणारं दुसरं कोणी नाही हो. तसा हा राग शृंगाररसप्रधानदेखिल आहे. एकूणच लडिवाळता हा याचा स्थायीभाव आहे.
बरं परत, ना हा कोणाच्या अध्यांत, ना मध्यांत. कुठे आदळआपट नाही, कुणाशी भांडण नाही, की कुणाशी स्पर्धा नाही. स्वतःच्याच पाच स्वरांच्या दुनियेंत हा मग्न असतो. आणि खरं सांगतो मंडळी, विलक्षण जादुई दुनिया आहे या भूपाची.
पटकन एक उदाहरण देऊ? बाबुजींनी बांधलेलं आणि लतादिदींनी गायलेलं भूपातलं "ज्योती कलश छलके" (चित्रपट-भाभी की चुडिया) हे गाणं ऐका. त्या गाण्याच्या अगदी सुरवातीलाच दिदींनी घेतलेली तान ऐका म्हणजे मी "विलक्षण जादुई दुनिया" हे शब्द का वापरले हे कळेल. आपण ते गाणं ऐकतांना बाबुजींना आणि दिदींना दाद देतो, आणि ती द्यायलाच पाहिजे. अहो पण मंडळी, त्यातली थोडीशी दाद आमच्या भूपालाही द्या की!! ;) "हुए गुलाबी, लाल सुनेहरे " ही ओळ ऐकतांना डोळ्यांत पाणी येतं हो! मी म्हटलं ना, की अत्यंत प्रमळ स्वभाव, तो हा!
मंडळी मला आठवतंय, मला दहावी ईयत्तेत सर्वसाधारणच मार्क मिळाले होते. पण दहावी पास झालो म्हटल्यांवर आमच्या आज्जीनी अत्यंत प्रेमळतेने स्वतःच्या हाताने केलेली बेसनाची वडी माझ्या हातावंर ठेवली होती!! भूप म्हणजे तरी दुसरं काय हो, त्या म्हाताऱ्या आज्जीनी केलेलं कौतुक आणि चारोळी घालून केलेल्या त्या बेसनाच्या वडीचा गोडवा!!
मंडळी, तुम्हांला अजून सोप्प करून सांगू का भूपाबद्दल? नारायणरांव बालगंधर्वांचं "सुजन कसा मन चोरी" हे स्वयंवरातलं पद ऐका. "सुजन कसा मन चोरी, अगं हा चोरी यदुकुलनंदन.."! भास्करबुवांनी "फुलबनं सेज बिछाई" या मूळ बंदिशीवरून हे पद बांधलं. भास्करबुवांसारख्या देवगंधर्वाची बांधणी, भूपासारखा राग आणि गाणांर साक्षात श्रीपाद नारायण राजहंस, अर्थांत नारायणराव बालगंधर्व!! मंडळी, श्रीमंती-श्रीमंती का काय ते म्हणतांत ना, ती हीच! दुसरं काही नाही!!
अजून काय बरं लिहू भूपाबद्दल? किशोरीताईंची भूपातली "सहेला रे, आ मिल गायेसप्तं सूरन के भेद सुनावे, सहेला रे..जनम जनम को संग ना भुले,अबके मिले सो, बिछूर न जाए, सहेला रे..
ही बंदिश ऐका. किशोरीताईंसारखी विलक्षण प्रतिभा लाभलेली गानसरस्वती आणि भूपाचा ऐसपैस कॅनव्हास!! अजून काय पाहिजे?
"स्वये श्री रामप्रभू ऐकती" हे गाणं ऐका. म्हणजे भूपाचा आवाका लक्षात येईल! "ज्योतीने तेजाची आरती" हे शब्द फक्त भूपातंच बसू शकतांत!
"सोडुन आसन उठले राघव,उठुन कवळीती आपुले शैशव,पुत्रभेटिचा घडे महोत्सव,परि तो उभयानच माहिती.."
मंडळी, हा तर भूपाचाच महोत्सव!! कोणाकोणाला दाद देणांर? महाकवी गदिमांना, बाबुजींना की भूपाला?
जाता जाता शेवटचं सांगतो. तुम्हाला सकाळी झोपेतून उठवतांना, "रे गधड्या उठ, उन्हं अंगावर आली", असं खेकसून उठवलेलं आवडेल की भूपातल्या "उठी लवकरी वनमाळी, उदयाचळी मित्र आला" हे आवडेल? तुम्हीच सांगा, आणि तुम्हीच ठरवा काय करायचं या भूपाचं ते! मी गेले २० वर्ष गाणं ऐकतोय, श्रवणभक्ति करतोय, पण अजूनही या भूपाचा ठांव मला लागलेला नाही आणि कधी लागणांर्ही नाही. आणि न लागलेलाच बरा!!
बेसनाची वडी देणारी आमची आज्जी नेहमी एक म्हण मला सांगायची, "तातोबा, माणसानं दिलेलं कधी पुरत नाही आणि देवानं दिलेलं कधी सरत नाही"!!!
बसंतचं लग्न..४ (मिया मल्हार)

नमस्कार मंडळी,
मी निघालो होतो बसंतच्या लग्नाला. इतर सर्व राग तर होतेच, पण आम्हा काही बसंतप्रेमी मंडळींना सुध्दा बसंतने आमंत्रण केलं होतं, म्हणून मीही चाललो होतो. चालतां चालतां दुपार झाली म्हणून एका गावांत भाजी भाकरी खाल्ली आणि तसांच पुढे निघालो. संध्याकाळपर्यंत तरी वऱ्हाडाच्या ठिकाणी पोचायचं होतं.
गावाबाहेर पडलो. पुढचा सगळा रस्ता मोकळ्या रानांतला, पायवाटेचा होता. दुपारचा दीड वाजला असेल. मस्त मोकळी राना-शेताडीची वाट. मी एकटाच. दूरदूर पर्यंत कोणी दिसत नव्हतं. वाराही सुटला होता, त्यामुळे वातावरणांत सुखद गारवा होता. मी माझ्याच तंद्रीत मस्त मजेत काहीबाही गुणगुणंत चाललो होतो.
पण हळुहळू अंधारून यायला लागलं. तेवढ्यांत जोराचं गडगडलं, आणि लखकंन वीज चमकली. आता मात्रं चांगलंच अंधारून आलं. सहज माझं लक्ष वरती आकाशाकडे गेलं. पाहतो तर काय, आकाशांत कृष्णमेघांची चांगलीच दाटिवाटी झाली होती. सूर्यमहाराज माझी साथ सोडुन केव्हांच त्या ढगाआड लपले होते. विजांचा चमचमाट आणि ढगांचं गडगडणं घाबरवायला लागलं. मगासच्या स्वच्छंदपणाच्या जागी थोडीशी भितीही वाटायला लागली. आणि नकळंत मला मंद्रसप्तकातले म प नि ध नी सा हे स्वर ऐकू यायला लागले!! सुरवातीचा गूढ कोमल निषांद आणि त्यानंतरचा शुध्द निषांद! मध्यातल्या कोमल गंधाराचा आणि शुध्द मध्यमाचा बेहलावा!! माझ्या मागून कोणतरी येतंय असं जाणवलं मला. तेवढ्यांत त्याने गाठलंच मला आणि माझ्या खांद्यावर हात ठेवला!! मंडळी, कोण होतं ते?ओहोहो, अहो तो तर मिया मल्हार!! त्या भरदुपारी अंधारल्या कुंद वातावरणांत मल्हारही निघाला होता बसंतच्या लग्नाला!!
मंडळी, काय लिहू मल्हारबद्दल? आपल्या रागसंगीतांतला विलक्षण ताकदीचा एक बलाढ्य राग! अंधारून येणं, सोबतीला कानठळ्या बसवणारा ढगांचा गडगडाट, वीजांचा चमचमाट, समोरचंही दिसू नये असा पाऊस, त्याचं ते रौद्र रूप हे सगळं मंद्र ते तार सप्तकातून दाखवण्याची ताकद मल्हारांत आहे. मंडळी, आपल्याला सृष्टीच्या सौंदर्याची अनोखी रुपं माहित आहेत. छान कोवळं ऊन, सुरेखसा गुलमोहर, स्वच्छ सुंदर हवा, पक्ष्यांचा किलबिलाट वगैरे वगैरे. पण आमच्या मल्हारनी एकदा ताबा घेतला, की या सगळ्यांची छुट्टी!आहे की, मल्हारचंही सौंदर्य आहे, पण ते रौद्र आहे. ते झेलायला माणूसही तेवढांच Dashing पाहिजे. येरागबाळ्याचं काम नाही ते!! "कर तुला हवा तितका गडगडाट, पाड विजा, कोसळ रात्रंदिवस. मी enjoy करतोय" असं म्हणणारा कोणीतरी हवा!!
मंडळी, येथे मला आग्रा गायकीचे बुजुर्ग पं दिनकर कायकिणी यांची मिया मल्हारमधील एक बंदिश आठवते. बुवा "दिनकर" या नावांने बंदिशी लिहितांत आणि बांधतात. अहो हा मल्हार त्या प्रेयसीला तिच्या पियाकडे जाऊ देत नाहिये!! बघा दिनकररावांनी काय सुंदर बंदिश बांधली आहे..
कारी रे बदरिया,
दामनी दमकत चमकत.
धधक उठत जिया मोरा,
अंग थरथर कापे, कारी रे बदरिया....
घन गरजे, मेहा बरसे
पी मिलन नैना तरसे
जाउ अब कैसे दिनरंग कहो,
मोरा मन, धीरज, धर धर तापे, कारी रे बदरिया....
क्या बांत है!! मंडळी, आत्तापर्यंतच्या वाटचालीत मल्हार खूप अनुभवलाय मी. तो चाललेला असतो त्याच्या वाटेने, कोणाशी बोलंत नाही आणि दुसरं कोणी त्याच्याशी बोलण्याची हिम्मत करत नाही! छान रिमझीम पाऊस पडणे, त्यात मस्तपैकी भिजणे, छोट्या ओहोळांत कागदी बोटी सोडणे, आणि नंतर घरी येऊन गरमागरम कांदाभजी खाणे व वाफाळलेली कॉफी पिणे म्हणजे मल्हार नव्हे, एवढं लक्षांत घ्या.
"आकाशांत ढगांचा पखवाज आणि बिजलीचा कथ्थक सुरू झाला होता" असं फार सुरेख वर्णन पुलंनी तुझं आहे तुजपाशी नाटकांत केलं आहे, तो खरा मल्हार!!!गौड मल्हार, शुध्द मल्हार, सूर मल्हार, मीरा मल्हार ही काही नातलंग मंडळी आहेत मिया मल्हारची. त्यांच्याशी मात्र थोडीफार दोस्ती करता येते. ही मात्र पाऊसाचे छान छान रंग दाखवतांत. आषाढांत आमचे मल्हारबा बरसून गेले की श्रावणांत हे नातलंग येऊन छानसं इंद्रधनुष्य पाडतांत!!
असो. मंडळी, मी मल्हारबद्दल कितीही लिहिलं आणि तुम्ही कितीही वाचलंत तरी आपण त्याचा lively अनुभव घ्यायला हवा, हेच खरं! मल्हार कोणी गावा? अरे क्या बात है, तो तर आमच्या भीमण्णांनीच गावा. मी मगाशी म्हटलं ना, येरागबाळ्याचं ते काम नाही. तिथे आमच्या भीमण्णांचाच बुलंद आणि धीरगंभीर आवाज हवा!!!
और राग सब बने बाराती,
दुल्हा राग बसंत!!
मंडळी, काय सांगू कौतुक त्या बसंतचे, त्याच्या लग्नाला आणि त्याला आशिर्वाद द्यायला आमचे मल्हार महाराजही निघाले आहेत! मला खात्री आहे, की लग्न मंडपात दाखल झाल्यावर भले भले आदबीने बाजुला होऊन आपल्या मल्हार महाराजांना सर्वांत पुढच्या सोफ्यावर बसवतील आणि आदरयुक्त भितीने चुपचाप बाजुला उभे राहतील!!!
बसंतचं लग्न..५ (बिहाग)
नमस्कार मंडळी,
और राग सब बने बाराती,
दुल्हा राग बसंत!!
आपल्या बसंतचं लग्न थाटामाटांत सुरू आहे. या लग्नाला सगळे रथी महारथी राग व रागिण्या आल्या आहेत, येत आहेत. भले भले राग येऊन आपापली आसने ग्रहण करत आहेत. तो कोण आहे बरं? एखाद्या हिरोसारखा? देखणा, रुबाबदार, सुंदर डोळ्यांचा? मांडवातल्या सगळ्या मुली तर त्याच्याकडेच बघत आहेत!
नाही ओळखलंत? अहो तो तर आपला बिहाग!! बिहागची शोभा काय वर्णावी महाराजा!! माणसांतली रसिकता, आयुष्याचा भरभरून आस्वाद घेण्याची वृत्ती म्हणजे बिहाग. एक अत्यंत रसाळ, शृंगाररसप्रधान राग. बिहाग म्हणजे चाहत!
बरेच दिवसांची नजरानजर, मग ओळख, मग चोरून भेटीगाठी, आणि मग एका सुरेख संध्याकाळी, निसर्गरम्य एकांती तीने भरलेला होकार! खल्लास!! अहो, बिहाग बिहाग म्हणतांत तो म्हणजे हा होकार!
"तुझा तो अमक्या अमक्या रंगाचा ड्रेस आहे ना? तो जाम आवडतो आपल्याला. त्यात तू एकदम फाकडू दिसतेस. तो घालशील उद्याच्या गॅदरींग ला?" तो."तो नको रे, मी तो नाही घालणांर. माझा अमका अमका घालायचं ठरलं आहे, मी तोच घालून येणार. तू सांगशील तसं सगळं होणार नाही!!" ती.
आणि मग गॅदरींगच्या दिवशी ती नेमका त्याने सांगीतलेलाच ड्रेस घालून येते!! मैत्रीणीदेखील त्याच ड्रेसचं कौतुक करतांत! ती हळूच त्याच्याकडे पाहते. त्याच्या चेहऱ्यावर मिश्किल विजयी भाव! त्याने सांगीतलं म्हणून तर तीने हा ड्रेस घातला होता, हे त्या मैत्रीणींना कुठे माहीत होतं? ते फक्त त्या दोघातलंच गूज होतं!! रोमँटीक शिक्रेटच म्हणा ना! :) मंडळी, हे त्या दोघातलं गूज म्हणजेच बिहाग!!
या ओळी पहा,
"धडकन मे तू है समाया हुआ,
खयालो मे तू ही तू छाया हुआ
दुनिया के मेले मे लाखो मिले,
मगर तू ही तू दिल को भाया हुआ"!!
वसंत देसाईंचं संगीत असलेल्या, लतादीदींनी गायलेल्या बिहाग रागातल्यांच या ओळी आहेत. त्यातल्या "मगर तू ही तू दिल को भाया हुआ" मधलं ते "भाणं" आहे ना? तोच बिहाग!! "दुनिया के मेले मे लाखो मिले"! अरे लाख असतील, पण तू म्हणजे तूच. दुसरं कोणी नाही!! मंडळी, बिहाग म्हणजे शृंगारातलं un-conditional surrender!!
बिहाग रागातलं नारायणराव बालगंधर्वांचं "मम आत्मा गमला" हे गाणं ऐका! नारायणरावांच्या गळ्यात फार शोभून दिसतो बिहाग! बालगंधर्वांनी "मम आत्मा गमला" या बिहागमधल्या पदामध्ये फार सुरेख रितीने कोमल निषादाचा एके ठिकाणी वापर केला आहे! वास्तवीक हा स्वर बिहागांत वर्ज्य आहे. पण नारायणरावांनी इतक्या चपखलपणे ही जागा घेतली आहे की क्या केहेने!! आता गाण्यामध्ये २+२=४ असं करणारी काही जन्मजांत क्लिष्ट मंडळी कपाळाला आठ्या घालतील! अहो पण बालगंधर्वांसारख्या, ज्याला खुद्द गाण्याचाच आत्मा गमला आहे त्याला मम आत्मा गमलातल्या बिहागात असं करायची मुभा आहे! असो.
"अब हू लालन मै का,
जुग बीत गये रे,
तुमरे मिलन को
जियरा तरसे रे.."
ही बिहागमधली पारंपारीक बंदीश आहे. फार सुरेख बंदीश आहे ही! येथे ऐका
"बोलीये सुरीली बोलीया,खठ्ठीमिठी आखो की रसिली बोलिया"
गृहप्रवेश या सिनेमातलं हे एक फार अप्रतीम गाणं आहे. यातला बिहाग फारच छान आहे. हे गाणं येथे ऐका
बिहागची नुसती सुरावट जरी कानी आली तरी मनुष्य लगेच फ्रेश होतो. शुध्द गंधाराची आणि षड्जाची अवरोही संगती, शुध्द मध्यमाची आणि मिंडेतल्या तीव्र मध्यमाची गंधार व पंचमामधली चाललेली लपाछपी, आश्वासक पंचम, सांभाळा हो, असं म्हणणारा शुध्द धैवत, सुरेखसं शृंगारीक अवरोही वळण असलेला शुध्द निषाद, आणि सगळे क्लायमॅक्स् उधळून लावणारा तार षड्ज! अरे यार काय सांगू बिहागची नशा!! मला तर आत्ता हे लिहितानांच खास खास मित्रमंडळी गोळा करून, झकासपैकी पान जमवून, तंबोऱ्याचा सुरेल जोडीच्या सानिध्यांत बिहाग गावासा वाटतोय! मनोगतींनो, येतांय का आत्ता माझ्या घरी? मस्तपैकी काहीतरी चमचमीत हादडू आणि सगळे मिळून बिहाग enjoy करू!!
असो, अजून काय नी किती लिहू बिहागबद्दल. मंडळी एकच सांगतो, हा राग माणसाला जिंदादिलीने जगायला शिकवतो. खरंच, आपलं गाणं खूप मोठं आहे. त्याची कास धरा! आत्तापर्यंतच्या माझ्या तोकड्या श्रवणभक्तीत मी अनेक दिग्गजांचा बिहाग अगदी मनापासून enjoy केला आहे. अजून खूप काही ऐकायचं आहे, शिकायचं आहे!
एक नमुना मारु बिहागचा, पं. अजय चक्रवर्तींच्या आवाजात.
बसंतचं लग्न..६ (मालकंस)

नमस्कार मंडळी,
बसंतच्या लग्नाची लगबग मांडवांत सुरूच आहे. विविधरंगी फुलांची सजावट केली आहे. अत्तराचा घमघमाट सुटला आहे. झकपक कपडे, दागदागीने घालून सगळी रागमंडळी नटुनथटून आली आहेत.
ते सर्वांत पुढे सोफ्यावर मल्हार महाराजांच्या बाजुलाच कोण बुजुर्ग व्यक्तिमत्वं बसलंय बरं? काय विलक्षण तेज आहे त्याच्या चेहेऱ्यावर!! एखादा योगी बसला आहे असंच वाटतंय! खुद्द आपला यमन त्यांच्या बाजुला अत्यंत अदबीने उभा राहून त्यांना काय हवं नको ते पाहतोय! इतर सगळे राग मोठ्या आदराने त्याला भेटत आहेत, वाकुन नमस्कार करत आहेत!! कोण, आहे तरी कोण ते?
मंडळी, ते आहेत मालकंसबुवा! राग मालकंस!!
मालकंसची थोरवी मी काय वर्णावी? धन्य ते आपलं हिंदुस्थानी रागसंगीत ज्यात मालकंस सारखा राग आपल्याला लाभला आहे! मालकंस, एक भक्तिरसप्रधान राग. समाधीचा राग. मंडळी, मालकंस तसा समजावून सांगायला कठीण आहे. यमन, भूप, हमीर, बिहाग जितक्या पटकन समजावून सांगता येतील तितक्या पटकन मालकंस नाही समजावता येणार! याचा अर्थ असा नव्हे की यमन खूप सोपा आहे, आणि मालकंस खूप कठीण आहे. याचा अर्थ असाही नव्हे की यातला एक मला जास्त आवडतो आणि एक कमी आवडतो. प्रश्न आहे तो हा, की मी आज भक्तिमार्गाच्या कितव्या पायरीवर उभा आहे? की अजून सुरुवातच झालेली नाहीये? कारण शेवटी प्रत्येक रागाचा प्रत्येक सूर त्या अंतीम शक्तीकडेच जातो, हे जर मान्य केलं तर आपण एवढंच म्हणू शकतो की आज यमनच्या प्रत्येक सुराबरोबर परमेश्वराशी संवाद साधणं मला जेवढं सोपं जात आहे तेवढं मालकंसमधून नाही!! माझी अजून तेवढी पोहोच नाही असं म्हणू आपण हवं तर!
भक्तिमार्गाच्या काही पायऱ्या असतांत. तात्या अभ्यंकरने विठोबाचं नांव घेणं, आणि तुकोबांनी विठोबाचं नांव घेणं यात जमीन-आस्मानापेक्षा सुध्दा कित्येक पट जास्त अंतर आहे की नाही?:) का आहे हे अंतर? तर तुकोबांची विठ्ठलापाशी जी लगन आहे, एकरुपता, एकतानता आहे, त्याच्या कित्येक मैल आसपासही तुमची माझी नाही! ती तुकोबांच्या पातळीची एकतानता, तेवढी एकरूपता, तेवढी लगन म्हणजे मालकंस!!!
गुंदेचाबंधू हे तरूण गायक माझे अत्यंत आवडते ध्रुपद गवय्ये आहेत. भोपाळला राहतात. त्यांचा प्रत्यक्ष मालकंस ऐकायचादेखील योग मला आला आहे. त्यांना इथे ऐका. गुंदेचाबंधूंनी मालकंसात केलेली आलापी आहे ही. बघा तरी ऐकून!
"जयती जयती श्री गणेश,शंकरसुत लंबोदर"
गुंदेचाबंधूंनीच गायलेली ही गणेशवंदना येथे ऐका. डोळ्यात पाणी येतं हो! अक्षरशः एखादा यज्ञ सुरू आहे असा भास होतो!!
मंडळी, धनश्री लेले नावाची माझी एक ठाण्याचीच मैत्रीण आहे. उच्चशिक्षित आहे. संतसाहित्याची, गीतेची, भाषेची खूप व्यासंगी आहे. वक्तृत्वही छान करते, आणि लिहितेही छान. तीच्याशी बोलतांना एकदा मालकंसचा विषय निघाला. मी लगेच माझं पांडित्य सुरू केलं!:) आणि मालकंस मला कसा भावतो हे सांगीतलं. मला एकदा मालकंस गुणगुणतांना एक एकतालातली धून सुचली होती, ती मी तिला गुणगुणून दाखवली. लगेच त्यावर तिने पहा काय छान शब्द रचले!
अस्थाईः
गुणीजन कर नित वंदन,
मन समाए सुख बसंत,
गुणीजन हरिसम जानत
अंतराः
रसिक रंग, मन उमंग,नवतरंग छायत हो,
नमो नमो, नमो नमो,गुणीजन सबको!
मालकंसमधली ही एक छान बंदीश झाली असं म्हणता येईल. वरदा गोडबोले नावाची माझी अजून एक मैत्रीण आहे. शास्त्रीय संगीत खूप छान गाते. आम्ही तिघांनी एके ठिकाणी होळीनिमित्त एक कार्यक्रम सादर केला होता, त्यात वरदाने ही बंदीश फार सुरेख गायली होती.
अजून काय काय नी किती दाखले देऊ मालकंसचे महाराजा?!! दिनानाथरावांनी गायलेलं तात्याराव सावरकरांचं "दिव्य स्वातंत्र्य रवि" येथे ऐका. म्हणजे मालकंसची Depth काय आहे ते लक्षात येईल. बाबुजींनी तर कमालच केली आहे. बाबुजींना तर मालकंसमध्ये देव, आणि देश हा एकच दिसला, आणि त्यांनी "वेदमंत्राहून आम्हा वंद्य वंदेमातरम्" हे फार अप्रतीम गाणं याच रागात बांधलं! या संकेतस्थळावर बैजुबावरा या चित्रपटातलं "मन तरपत" हे मालकंसातलं गाणं ऐका. नौशादसाहेबांना आणि रफीसाहेबांना आपला सलाम! फार सुरेख गाणं आहे हे!
मंडळी, अजून काय सांगू मालकंसबद्दल? मनुष्य अक्षरशः गुंग होतो. आत्मानंदी होतो! मालकंस आपल्याला परमेश्वरी अस्तित्वावर विश्वास ठेवायला भाग पाडतो. आयुष्यात केव्हातरी अशी वेळ येते की जिथे मनुष्य जरा थांबतो आणि त्याला थोडसं मागे वळून पहावसं वाटतं. इथपर्यंत आलो खरे. काय चुकलं आपलं? आपल्याकडून कोणी उगीचच्या उगीच दुखावलं तर नाही ना गेलं? आता पुढचा प्रवास कसा होईल? कुठेतरी जरा काही क्षण डोळे मिटुन स्वस्थ बसावसं वाटतं, आणि थोडसं आत्मचिंतन करावसं वाटतं. हे आत्मचिंतन म्हणजे मालकंस! मंडळी, मालकंसच्या सुरांत एवढी विलक्षण ताकद आहे की, हेवे-दावे, द्वेष-मत्सर, तुझं-माझं, यासारख्या गोष्टी क्षणांत क्षूद्र वाटायला लागतात! वाल्मिकी होण्यापूर्वी वाल्याने रामनामाचा जो जप केलान ना, तो जप म्हणजेच मालकंस!!
आणि Last, but not least!
"अणुरणीया थोकडा, तुका आकाशाएवढा" हे गाण्याकरता भीमण्णांना मालकंस रागासारखा दुसरा आधार नाही. ते सामर्थ्य फक्त मालकंसमध्येच! अण्णांसारखा स्वरभास्कर जेव्हा दोन तंबोऱ्यांमध्येबसून "तुका म्हणे आता, उरलो उपकारापुरता" अशी आळवणी करतो ना, तेव्हा त्या सभागृहात तो "सावळा"कमरेवर हात ठेऊन प्रसन्न मुद्रेने उभा असतो!!
बसंतचं लग्न..७ (हमीर)
राम राम मंडळी,
आपण सगळेजण बसंतच्या लग्नाला जमलो आहोत. आत्तापर्यंत भले भले राग मांडवात येऊन बसले आहेत. सुरेख माहोल जमला आहे. नवऱ्यामुलाजवळ नंद, बिहाग, केदार, शामकल्याण, कामोद, नट, छायानट, गौडसारंग ही त्याची सगळी मित्रमंडळी धमाल करत बसली आहेत!
हे काय? तो कुठला राग त्यांच्यात बसला आहे हो? त्याचा उत्साह तर नुसता ओसंडून वाहतोय! त्या सगळ्यात तो अगदी विशेष उठून दिसतोय? कोण आहे तो?
मंडळी, तो आहे राग हमीर! ओहोहो, क्या केहेने!! अहो हमीर रागाबद्दल किती बोलू अन् किती नको! आपल्या हिंदुस्थानी राग संगीतातला एक फार सुरेख राग. याचा मूळ स्वभाव शृंगारीक. पण प्रसन्नता, उमद्या वृत्तीचा या याच्या स्वभावाच्या इतरही बाजू आहेत. आज मी इथे माझ्या परीने हमीर समजावून सांगणार आहे. वर उल्लेख केलेल्या त्याच्या मित्रमंडळींबद्दल सवडीने लिहिणारच आहे, पण आज आपण हमीर या रागाबद्दल बोलूया. आधी आपली या रागाशी पटकन तोंडओळख व्हावी म्हणून हे रागाचं एक लहानसं क्लिपिंग ऐका. हे ध्वनिमुद्रण आपल्याला रागाची बेसिक माहिती देईल."धीट लंगरवा कैसे घर जाऊ" ही एक फार सुरेख पारंपारीक बंदीश आपल्याला ऐकायला मिळेल. पहा किती प्रसन्न स्वभाव आहे आमच्या हमीरचा!!
मंडळी, आता आपण हमीराचं शास्त्रीय संगीताच्या दुनियेतलं स्थान पाहू. हा राग जास्त करून ग्वाल्हेर घराण्यात गायला जातो, इतरही घराण्याची मंडळी हा राग गातात, नाही असं नाही. परंतु या रागाची तालीम प्रामुख्याने ग्वाल्हेर घराण्यात दिली जाते. "चमेली फूली चंपा" ही हमीरातली झुमऱ्यातली पारंपारीक बंदीश फार प्रसिध्द आहे. वा वा! गायकाने स्थायी भरून चंपा या शब्दावर प्रथम सम गाठली की मैफल हमीरच्या ताब्यात गेलीच म्हणून समजा. मला पं उल्हास कशाळकर, पं यशवंतबुवा जोशी, सौ पद्मा तळवलकर, आमचे पं मधुभैय्या जोशी यांच्या मैफलीत भरपूर हमीर ऐकायला मिळाला आहे. पं गजाननबुवा जोशी व्हायोलीनवर हा राग काय सुरेख वाजवायचे!वा! फारच श्रीमंत राग हो! ऐकून मन कसं प्रसन्न होतं!! ग्वाल्हेरवाली मंडळी मस्तपैकी झुमऱ्याबरोबर खेळत खेळत असा सुंदर हमीर रंगवतात, वा! अगदी ग्वाल्हेर घराण्याचे एक अध्वर्यु पं विष्णू दिगंबर पलुसकर यांचे तितकेच गुणी चिरंजीव पं दिगंबर विष्णू, अर्थात बापुराव पलुसकर यांची 'सुरझा रही हो' ही हमीरमधली बंदीश ऐका! बघा, त्यांनी हमीर काय सुरेख गायला आहे! एक तर बापुरावांचा आवाज म्हणजे खडीसाखर, त्यात त्यांचं ग्वाल्हेर गायकीवरील प्रभूत्व आणि त्यात हमीरसारखा उमदा राग! का नाही गाणं रंगणार महाराजा?
मंडळी, आपल्या नाट्यसंगीतातदेखील हमीर रागाचा उत्तम उपयोग करून घेतला गेला आहे. पटकन एक उदाहरण देऊ? पं सुरेश हळदणकरांचं "विमलाधर निकटी मोह हा" हे संगीत विद्याहरणातलं पद ऐका. बघा, हमीर किती उठून दिसतो यात. आणि त्यात हळदणकरबुवांसारखा समर्थ गायक! आणि हो, "नमन नटवरा विस्मयकारा" ही नांदीदेखील आपल्या हमीरातीलंच की! वा वा!!
मंडळी, ही झाली हमीर रागाची रागसंगीतातली बाजू. काय म्हणता? तुम्हाला लाईट संगीत जास्त आवडतं? मग इथेही हमीर आहेच की! अगदी प्रसिध्द उदाहरण म्हणजे रफीसाहेबांचं हे गाणं!
काय? पटली की नाही हमीरची पुरती ओळख?:) क्या केहेने! या सुंदर गाण्याबद्दल नौशादसाहेबांना, रफीसाहेबांना आणि आपल्या हमीरला कितीही दाद दिली तरी कमीच!
"पगमे घुंगर बांधके,
घुंगटा मुखपर डारके,
नैनमे कजरा लगाके
रे मधुबन मे राधिका नाचे रे"!!
ओहोहो! हे गाणं ऐकून डोळ्यात आनंदश्रू उभे रहातात हो! मंडळी, काय गोड गळा! काय सुरेख गायचे हो रफीसाहेब! इतका मधुर पण तयारीचा आवाज! रफीसाहेबांना आपला सलाम!! नौशादसाहेबांनी तर यात हमीराचं सोनं अक्षरशः मुक्तहस्ते लुटलं आहे हो! पण काय सांगू? कितीही लुटली, तरी हमीराची श्रीमंती जराही कमी व्हायची नाही! खरंच मंडळी, आपलं रागसंगीत फार फार श्रीमंत आहे.
आणि मंडळी राग म्हणजे तरी काय हो? तर एक ठरावीक स्वरसंगती, आणि त्यातून निघालेला एक विचार. प्रत्येक रागाला स्वतःचा असा एक चेहरा असतो. एखादा राग ऐकतांना आपल्या कानांना तो कसा लागतो, त्यातून आपल्या मनात कोणते विचार येतात, कोणत्या भावना निर्माण होतात हे महत्वाचं!
आता हमीरचंच उदाहरण घेऊ. मी तात्या अभ्यंकर, या हमीरचा एक श्रोता. त्याच्या प्रेमात पडलेला. आता हमीर हा राग मला जसा वाटेल, अगदी तसाच तो प्रत्येकाला वाटेल असं नाही. पण हा राग मला कसा वाटला याची मी काही उदाहरणं देऊ शकेन. आता बघा हां, हमीर ऐकून तो समजून घेतांना माझ्या मनात आलेली एक situation. अगदी साधं उदाहरण. बघा आपल्याला पटतंय का!
समजा मी २४-२५ वर्षांचा एक तरूण मुलगा आहे. घरदार, पै-पैसा, नोकरीधंदा सगळं व्यवस्थित आहे. घरची मंडळी आता माझ्या लग्नाचं बघू लागली आहेत.(समजा हां! :D) स्थळं येत आहेत. पिताश्री हळूच विचारत आहेत, "काय रे, तुझं तू कुठे जमवलं नाहीयेस ना? बघू ना तुझ्याकरता स्थळं?" मी त्यांना स्थळं बघायला सांगतो. वास्तवीक मी एका मित्राच्या लग्नात गेलो असतांना तिथे वधूची एक मैत्रीण माझ्या मनांत भरली होती!;). ओहोहो, काय सुरेख होती ती! गोरीपान, बोलके डोळे. पण मंडळी मी थोडा बुजरा आहे. तिच्याकरता पण स्थळं बघताहेत अशी जुजबी माहिती मला खरं तर मिळाली होती, पण ओळख काढून तिला डायरेक्ट विचारायची हिंमत नाही. आता मनांत भरली होती खरी, पण काय करणार? त्यापेक्षा पिताश्री स्थळं बघतच आहेत त्यातल्याच एकीशी चुपचाप लग्न करावं, असा पापभिरू विचार मी केला आहे!!
एक एक स्थळं बघतो आहे, आणि काय सांगू महाराजा!! ज्या संस्थेत नांव नोंदवलं होतं तिथून नेमकी तीच मुलगी मला सांगून आली!! ती हो.., मांडवात दिसलेली!!
झालं. हवेत तरंगतच आमचा पाहण्याचा कार्यक्रम पार पडला, आणि तिचा होकारही आला. साखरपुडा झाला, आणि आम्ही दोघे प्रथमच बाहेर फिरायला गेलो. तेव्हा तिने मिष्किलपणे मला विचारलं,
"खरं सांग. त्या लग्नात चोरून चोरून सारखा माझ्याकडे बघत होतास ना? मला तेव्हाच लक्षात आलं होतं! आणि खरं सांगायचं तर मलाही तू तेव्हा आवडला होतास!!
ओहोहो मंडळी, आपण खल्लास! अहो हमीर हमीर म्हणतात तो हाच की!! :)
अशी आणखीही काही उदाहरणं देता येतील. तेवढी ताकद आपल्या रागसंगीतात आहे. आपल्या प्रत्येक भाव-भावनांचं फार सुरेख दर्शन आपल्याला रागसंगीतातून होतं. नाही, मायकेल जॅक्सन मोठा असेल हो! मी नाही म्हणत नाही, पण प्रथम आपण आपल्या घरी काय खजिना भरून ठेवला आहे तो नको का बघायला? पिझ्झा, बर्गर जरूर खा, पण त्याआधी थालिपीठ, खरवस, अळूवड्या खाऊन तर बघा!!!
मग? करणार ना हमीरशी दोस्ती? करूनच पहा. आयुष्यभर साथ सोडणार नाही असा मित्र लाभेल तुम्हाला!!
बसंतचं लग्न..८ (भीमपलास)
बसंताच्या लग्नाची धामधूम मंडपात सुरू आहे. आतापर्यंत भले भले राग आपल्या बसंतला आशिर्वाद, शुभेच्छा देण्यासाठी आलेले आहेत, स्थानापन्न झालेले आहेत. आणीही काही राग येत आहेत, येणार आहेत. हिंदुस्थानी रागसंगीताची एक मांदियाळीच आहे ही!.
एक राग मात्र कौतुकाने बसंतच्या लग्नाची ही सगळी लगबग पहात उभा आहे. फार गोड राग आहे तो. वा! काय प्रसन्न मुद्रा आहे त्याची! मंडळी, काही काही माणसं अशी असतात, की त्यांना कधी रागावताच येत नाही. त्यांच्या मनात प्रत्येकाबद्दल फक्त कौतुक आणि कौतुकच भरलेलं असतं. तसाच हा राग आहे. कोण आहे बरं हा?
मंडळी हा आहे राग भीमपलास..!!
भीमपलास म्हणजे सात्त्विकता. मी काय वर्णावी भीमपलासची गोडी! आपला भीमपलासशी पटकन परिचय व्हावा म्हणून हे एक लहानसं क्लिपींग ऐका.
"बीरज मे धूम मचावत कान्हा
कैसे के सखी जाऊ अपने धाम"
ही भीमपलासातील पारंपारिक बंदिश आपल्याला ऐकायला मिळेल. कान्ह्याने आपल्या लीलांनी एवढी धूम मचावून ठेवली आहे की घरी कसं जायचं हा प्रश्न गोपींना पडला आहे. कधी वाट रोखून तो खोड्या काढील, हे काही सांगता यायचे नाही. पण मंडळी, खरं पाहता या गोपींची ही तक्रार काही खरी नाही. त्यांना खरं तर कान्ह्याने खोडी काढलेली हवीच आहे. त्यांची आंतरिक इच्छा तीच आहे. ही आंतरिक इच्छा म्हणजेच भीमपलास..!
मंडळी, काय काय सांगू भीमपलासाबद्दल? कसा आहे भीमपलासचा स्वभाव? अत्यंत सात्त्विक, प्रसन्न. मला तर भीमपलास म्हटलं की शनिवारचा उपास, साबुदाण्याची खिचडी, गरम मसाला दूध, आणि छानसा बर्फीचा तुकडा या गोष्टी आठवतात..!
आपण आजपर्यंत बसंतच्या लग्नात अनेक राग पाहिले. गोडवा, प्रसन्नपणा हा यातील प्रत्येकाचा स्थायीभाव आहे. तरीही या प्रत्येकाचं वेगळं असं एक वैशिष्ट्य आहे. त्यातले काही यमन सारखे हळवे असतील, बिहाग, हमीर सारखे शृंगारिक असतील, मालकंसासारखे साधूजन असतील, तर काही मिया मल्हारासारखे अद्भुत असतील. तसंच भीमपलास हा राग प्रसन्न, गोड तर आहेच, पण त्यातली सात्विकता ही मला विशेष भावते. आज आपल्या मराठी संगीतात या रागात अगदी भरपूर गाणी आपल्याला ऐकायला मिळतील. तरी या रागाची गोडी तसूभरही कमी होत नाही.
"स्वकुल तारक सुता,
सुवरावरूनी वाढवी वंशवनिता"
स्वयंवरातल्या नारायणराव बालगंधर्वाच्या वरील पदातला भीमपलास पहा काय सुरेख आहे. असा भीमपलास झाला नाही, होणे नाही. भास्करबुवांचं संगीत, अत्यंत लडिवाळ गायकी असणारे नारायणराव आणि राग भीमपलास! मंडळी, अजून काय पाहिजे?
"अमृताहुनी गोड नाम तुझे देवा
मन माझे केशवा, का बा न घे?"
माणिकताईंचं हे गाणं ऐका. आहाहा! अरे काय सांगू माझ्या भीमपलासाची थोरवी! अहो, देवाचं नांव तर अमृताहूनी गोड आहेच, पण यातला भीमपलासही अमृताहुनी गोड आहे! भीमपलासमधील सात्त्विकता, गोडवा समजून घ्यायचा असेल तर या गाण्याचा अवश्य अभ्यास करावा. एक तर माणिकताई या नारायणरावांच्याच पठडीतल्या. त्यामुळे हे गाणंदेखील 'स्वकुल तारका' इतकंच भावतं! यातली 'सांग पंढरीराया काय करू यासी' ही ओळ ऐका. ही ओळ ऐकतांना तो कर कटावरी ठेवूनी विटेवरती उभा असलेला प्रसन्नमुद्रेचा पंढरीराया अगदी डोळ्यासमोर येतो हो!! भीमपलास राग हा त्या विठोबाने दिलेला प्रसादच आहे. चाखून तर बघा एकदा..
दशरथा घे हे पायसदान,
तुझ्या यज्ञी मी प्रगट जाहलो,
हा माझा सन्मान...
मंडळी, अहो या भीमपलासाने बाबुजींना मोहिनी नसती घातली तरच नवल! वरील गाणं ऐकावं म्हणजे या रागाचा आवाका लक्षात येईल. या गाण्यातलं एक कडवं आहे-
'श्रीविष्णूंची आज्ञा म्हणूनी,आलो मी हा प्रसाद घेवूनी,या दानासी, या दानाहून अन्य नसे उपमान....दशरथा घे हे पायसदान....
या ओळी ऐकतांना भीमपलासबद्दल 'या रागासी, या रागाहून अन्य नसे उपमान..' असंच म्हणावसं वाटतं! :)
गीतरामायणातलंच अजून एक गाणं-
"मुद्रिका अचूक मी ओळखिली ही त्यांची
मज सांग अवस्था, दूता रघुनाथांची"
हादेखील फार सुरेख भीमपलास आहे. गीतरामायणातल्या गाण्यातल्या गाण्यांवर एक स्वतंत्रच लेखमालाच लिहावी लागेल!
इंद्रायणी काठी, देवाची आळंदी
लागली समाधी ज्ञानेशाची....
ओहोहोहो..!! मंडळी, काय बोलू मी यावर? आपणच ठरवा भीमपलासचं सामर्थ्य! भाईकाकांचं संगीत, राग भीमपलास आणि साक्षात स्वरभास्करांचा आवाज..!!
मंडळी, अण्णांचा तसंच अनेक गवयांचा भीमपलासातील फार सुरेख ख्याल मला माझ्या सुदैवाने अनेकवेळा ऐकायला मिळाला आहे. अण्णांचे 'सुखाचे हे नाम आवडीने गावे', 'याच साठी केला होता अट्टाहास', 'यादव नी बा रघुकुलनंदन' यासारखे अनेक मराठी, कानडी अभंग भीमपलास रागात आहेत. ते त्यांच्या संतवाणी या कार्यक्रमातून अनेक वेळेला अगदी भरभरून ऐकले आहेत. कविवर्य वसंत बापट फार सुरेख निरूपण करीत. संतवाणी म्हणजे अण्णांचं दैवी गाणं आणि वसंत बापटांचं फार रसाळ निरूपण असं केशर घातलेलं आटीव दूधच!
असो..
मंडळी, खरंच सांगतो आपलं हिंदुस्थानी रागसंगीत एक खजिना आहे. उगाच इकडे तिकडे कुठे जाऊ नका. आपल्याच पोतडीत थोडं डोकावून पहा!
सरते शेवटी भीमपलासातल्या अभंगातील,
"अवघाची संसार सुखाचा करीन,
आनंदे भरीन, तिन्ही लोकी"
एवढेच सांगणे आहे...!
बसंतचं लग्न..९ (मुलतानी)

राम राम मंडळी,
आज आपण बसंतच्या लग्नात 'मुलतानी' या रागाबद्दल बोलणार आहोत. मंडळी मुलतानी हा आपल्या संगीतातला एक अत्यंत भारदस्त राग. मला तर या रागाला "Rich' या शिवाय दुसरा शब्दच सुचत नाही. मुलतानी तो मुलतानी! पण मंडळी, हा नुसताच Rich नाही तर मला तो थोडासा अद्भुतही वाटतो. अगदी सुरवातीपासूनच यातल्या स्वरांचं वजन आणि त्याचा भारदस्तपणा मनाचा ताबा घेतो. आपल्याला या रागाची पटकन ओळख पटावी म्हणून हे ध्वनिमुद्रण ऐका.
"नैनमे आनबान कोनसी परी रे"
ही मुलतानीतली पारंपारिक बंदीश सौ श्रुती सडोलीकरांनी गायली आहे. त्यांनी मध्यलय एकतालात काय मस्त जमवली पहा ही बंदिश! काय पण स्वरांचं आणि लयीचं वजन! क्या बात है.. तीव्र मध्यम, मगरेसा, धप इत्यादी संगती काय सुरेख वाटतात!
या रागाशी आपला अजून परिचय व्हावा म्हणून दिनानाथरावांचं हे पद ऐका. 'प्रेम सेवा शरण' हे झपतालातलं विलक्षण ताकदीचं मुलतानीतलं पद आहे हे. यात फक्त एके ठिकाणी शुद्ध धैवत लावला आहे. पण सध्या आपण पहिल्या दोन ओळींकडे लक्ष देऊ. मंडळी, या पदातल्या मुलतानीच्या स्वरांचं वजन पाहूनच भारावून जायला होतं! 'सहज जिंकी मना' ही ओळ ऐका. काय सुरेख मुलतानी दिसतो या ओळीत. 'सहज' या शब्दातला निषाद हा खास मुलतानीचा निषाद. अगदी आमच्या अण्णांच्या तंबोऱ्यातला!! आहाहा..
हे पद मूळ भीमपलास या रागातलं. त्यातही हे पद अतिशय सुरेखच वाटतं. करीमखासाहेब हे पद भीमपलासातच फार सुरेख गात असत. पण मुलतानी या रागाने दिनानाथरावांवर अशी काही भुरळ घातली की त्यांनी हे पद मुलतानीत अत्यंत समर्थपणे बांधलं. पण क्या बात है, त्यामुळे श्रोत्यांची मात्र चंगळच झाली की हो! त्यांना भीमपलासातला प्रासादिकपणा, सोज्वळपणा आणि मुलतानीतला भारदस्तपणा हे दोन्ही अनुभवायला मिळालं!
'तरून जो जाईल सिंधू महान
असा हा एकच श्री हनुमान'
ओहोहो, क्या बात है! बाबुजींनी गीतरामायणातलं हे गाणं बांधताना मुलतानीचा फार सुरेख उपयोग केला आहे. हनुमानाचं वर्णन करायला हाच राग हवा हो! हनुमानाइतकाच अद्भुत! एकेका कडव्यातून यातला मुलतानी आपल्याला अधिकाधिक सुंदर दिसू लागतो.
बरं का मंडळी, या गाण्यातलं,
'शस्त्र न छेदील या समरांगणी,
विष्णुवराने इच्छामरणी,
ज्याच्या तेजे दिपे दिनमणी,
चिरतर आयुष्मान,
असा हा एकच श्री हनुमान..'
हे वर्णन रागदारी संगीताचा विचार केल्यास जसंच्या तसं आमच्या मुलतानीलाही लागू आहे हो. खरंच अत्यंत तेजस्वी राग. अगदी हनुमानाइतकाच! हा राग मैफलीचा एकदम ताबाच घेतो आणि अशी काही हवा करून टाकतो की क्या बात है!
या रागातल्या दोन स्वरांमधलं अंतरदेखील अत्यंत पारदर्शक आणि देखणं आहे. इतर रागांच्या तुलनेत हा राग गायलादेखील जरा कठीणच आहे. हा खास रियाजाचा, समाधीचा राग आहे. हा राग गाताना अगदी भल्या भल्या गायकांचा कस लागतो. मुलतानीला प्रसन्न करायचं म्हणजे महामुश्किल काम. पण एकदा का जमला की मात्र मुलतानी असा काही चढतो! आहाहा. भन्नाट जमलेल्या मुलतानीच्या ख्यालाची मैफल म्हणजे या पृथ्वीतलावावरील मैफलच नव्हे ती. मंडळी, एकूणच हा एक मस्तीभरा, चैनदार राग आहे. जमला तर याच्यासारखा दुसरा कोण नाही. दुपारी यथास्थित बासुंदी-पुरीचं जेवण, त्यानंतर ताणून झोप आणि पाचच्या सुमारास दोन तंबोऱ्यात जमलेला सुरेल मुलतानी. अजून काय पाहिजे आयुष्यात?!
बसंतच्या लग्नाच्या मंडपात याची शान आणि रुबाब काय विचारता मंडळी! सगळेजण त्याच्याकडे नवलाईनेच पहात आहेत. आपल्या बसंतला आनंदाचं कोण भरतं आलं आहे. मुलतानीनेही बसंताची उराउरी भेट घेतली आहे आणि आपल्याच मस्तीत मोठ्या ऐटीने मंडपात सोफ्यावर दरबारी, मालकंसाच्या शेजारी विराजमान झाला आहे. "हम जानते है के हम मुलतानी है!" अशी मिष्किली चेहऱ्यावर ठेवून!
कर्नाटकातल्या गदग गावचा भीमसेन जोशी नांवाचा एक मुलगा उठतो, गुरूगृही जातो, आणि सकाळी तोडी, दुपारी मुलतानी, आणि संध्याकाळी पुरिया या तीन रागांवर अक्षरशः भीमसेनी मेहनत करतो, आणि स्वरभास्कर पं भीमसेन जोशी होतो! ऐका मंडळी, अण्णांचा मुलतानी इथे ऐका आणि धन्य व्हा!
बसंतचं लग्न..१० (तोडी)

बसंतच्या लग्नाच्या स्वरोत्सवाचा आज दहावा भाग! आपल्या सर्वांच्या सहकार्याने येथपर्यंत येऊ शकलो याचा आनंद वाटतो. या दहाही भागातलं जे काही चुकलेलं असेल तर ते माझं, आणि जे काही बरं, चांगलं असेल ते माझ्या गुरुजनांचं अशीच माझी भावना आहे. ही लेखमाला म्हणजे भीमसेनअण्णा आणि बाबूजी यांचीच पुण्याई, असं मी मानतो.
आजपर्यंत बसंतच्या लग्नात आपण ९ राग पाहिले. आज कोण येणार आहे बरं? मंडळी, आज एक खूप खूप मोठा पाहुणा आपल्या बसंतला आशीर्वाद द्यायला येणार आहे. अगदी 'झाले बहु,....परंतु यासम हा' असं म्हणावं, अशीच या पाहुण्याची थोरवी आहे!
मांडवाच्या बाहेर नुकताच एक रथ येऊन थांबला आहे. मांडवात क्षणभर एकदम स्तब्धता पसरली आहे. मांडवातली बरीचशी रागमंडळी रथातून आलेल्या रागाला अगदी अदबीने उतरवून घ्यायला आली आहेत. का बरं अशी स्तब्धता, एवढी अदब? कुठला बरं राग उतरत आहे त्या रथातून? मंडळी, त्या रागाचं नांव आहे 'तोडी'!
तोडीची पुण्याईच मोठी!
राग तोडी! आपल्या हिंदुस्थानी राग संगीतातला एक दिग्गज राग. ऐकणाराची अगदी समाधी लागावी असा. या रागाला माझ्यामते एक 'माईलस्टोन राग' असंच म्हणावं लागेल. विलक्षण स्वरसामर्थ्य अंगीभूत असलेला एक करूणरसप्रधान राग. आपल्याला या रागाची पटकन ओळख पटावी म्हणून हे लहानसे ध्वनिमुद्रण ऐकावे.
आज मी तोडीच्या स्वभावाबद्दल/व्यक्तिमत्त्वाबद्दल थोडं बोलणार आहे. तोडीच्या स्वरांत काय विलक्षण ताकद आहे हे माहीत नाही, पण ते ऐकताच मनुष्य एकदम स्तब्धच होतो. अंतर्मुख होतो. मंडळी, तोडीचा विलंबित ख्याल ऐकताना नेहमी अज्ञात असं एक व्यक्तिमत्त्व माझ्या डोळ्यासमोर उभं राहतं. त्या व्यक्तिमत्त्वाचं वर्णन मी आज करणार आहे. तोडी या रागाबद्दल मला जे काही सांगायचं आहे ते या वर्णनातूनच सांगायचा प्रयत्न मी करणार आहे. कशी आहे ही तोडी नांवाची व्यक्ती?
आयुष्यभर अनेक टक्केटोमणे, खस्ता खाल्लेली ही व्यक्ती आहे. या व्यक्तीकडे नुसतं पाहूनच आयुष्यात हिने काय काय भोगलं आहे याची कल्पना यावी. पण मंडळी, काही वेळेला आयुष्याचे भोग भोगता भोगताच बरेच जण कोलमडतात, दुर्दैवाने शेवटपर्यंत निभावून नेऊ शकत नाहीत. पण मला तोडीत दिसणारी व्यक्ती तशी नाही. अनेक वादळं पचवून ही व्यक्ती तेवढ्याच स्वाभिमानाने अगदी खंबीरपणे उभी आहे. आणि म्हणूनच ती मला मोठी आहे. मंडळी, परिस्थितीमुळे काही काही व्यक्तींना दिवसेंदिवस उपाशी रहावं लागतं. पण त्या कधी कोणापुढे लाचारीचा हात पसरत नाहीत. ध्येयापासून न ढळता यांची तपश्चर्या सुरूच असते. या तपश्चर्येतूनच स्वाभिमानाचं, कर्तृत्वाचं असं एक तेज यांच्या चेहऱ्यावर झळकतं. मंडळी, तोडी रागाच्या व्यक्तिमत्त्वात (खास करून पंचमात!) असंच एक तेज मला नेहमी दिसतं. त्या तेजाला कर्तृत्वाचा गर्व नाही, उलट गतआयुष्यातल्या कारुण्याची, भोगलेल्या हाल-अपेष्टांची एक झालर आहे! मंडळी, मला तरी तोडी हा राग नेहमी असाच दिसला, असाच भावला. प्रत्येकाला तो तसाच दिसावा असा आग्रह मी तरी का करू? शेवटी गाणं ही प्रत्येकाने स्वतः अनुभवायची गोष्ट आहे हेच खरं!
बिलासखानी, गुजरी-गुर्जरी, भूपाली, ही तोडीची काही नातलग मंडळी. ही सर्वच मंडळी फार सुरेख आहेत. यावर पुन्हा कधीतरी विस्तृतपणे लिहायचा प्रयत्न करेन. आपण आज बोलतोय ते 'मिया की तोडी' याबद्दल. उत्तर हिंदुस्थानात हिला काही ठिकाणी 'पंचमवाली तोडी' असंही गाण्यातल्या बोलीभाषेत म्हटलं जातं. बाकी हिचा इतिहास काय, उगम काय, पुस्तकात हिला काय म्हणतात ते मला माहीत नाही.
सुरश्री केसरबाई केरकर! जयपूर घराण्याच्या एक समर्थ गायिका. विलंबित त्रितालाचा भारीभक्कम दमसास, गोळीबंद आवाज, आणि निकोप तान या केसरबाईंच्या गाण्यातील खासियती. अगदी ऐकत रहावं असं बाईंचं गाणं! त्यांनी गायलेला तोडी रागाचा एक तुकडा येथे ऐका. किती सुरेख आहे पहा हा तोडी. बाईंनी मध्यलयीतील बंदिश काय सुरेख धरून ठेवली आहे! क्या बात है..
भारावलेलं वातावरण. वडिलांच्या इच्छेप्रमाणे मर्यादापुरुषोत्तम श्रीराम वनवासात निघाले आहेत. अवघी अयोध्या शोकाकुल झाली आहे, आणि गदिमांची लेखणी लिहू लागली आहे,
राम चालले तो तर सत्पथ,
थांब सुमंता, थांबवी रे रथ.
थांबा रामा, थांब जानकी,
चरणधूळ द्या धरू मस्तकी,
काय घडे हे आज अकल्पित?
थांब सुमंता, थांबवी रे रथ.
मंडळी, बाबूजींसारख्या प्रतिभावंताला त्या अयोध्येच्या शोकाकुल, भारावलेल्या वातावरणात जे दिसलं ना, त्यालाच तोडी म्हणतात!
सवाईगंधर्व संगीतमहोत्सव. हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील एक मानाचं पान! तिसरा आणि शेवटचा दिवस आहे. सकाळची वेळ आहे. पुण्याच्या रमणबाग येथील न्यू इंग्लिश स्कूलचं पटांगण दहा-बारा हजार श्रोत्यांनी तुडुंब भरलं आहे. तीन दिवस चाललेल्या गानयज्ञाची सांगता करण्यास मंचावर स्वरभास्कर पं भीमसेन जोशी सिद्ध आहेत.
विलंबित आलापी संपवून अण्णांनी तोडीची मध्यलयीतली बंदिश सुरू केली आहे, आणि हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत साऱ्या त्रिखंडाकरता शुभ, आणि मंगलदायी ठरत आहे!
बसंतचं लग्न..११  (शुद्ध सारंग-गौड सारंग)
राम राम मंडळी,
आपल्या बसंताचं लग्न अगदी थाटामाटात सुरू आहे. आता जेवणावळींची तयारी सुरू आहे. सुरेखश्या रांगोळ्या घातल्या आहेत. मंद सुवासाच्या उदबत्त्या लावल्या आहेत. मल्हार, मालकंस, मुलतानी, तोडी, दरबारी यासारख्या बड्या बड्या रागमंडळींची पंगत बसली आहे. साजूक तुपातल्या, अगदी आतपर्यंत पाक शिरलेल्या, केशर घातलेल्या जिलब्या, चवदार मठ्ठा, मसालेभात, डाळिंब्यांची उसळ, गरमागरम पुऱ्या, असा साग्रसंगीत बेत आहे. हल्लीसारखी पहिल्या वरण-भातानंतर लगेच पब्लिकच्या पानात मसालेभात लोटायचा, ही पद्धत इथे नाही बरं का! पहिला वरण-भात, मग जिलेबी, मग डाळिंबीउसळ-पुऱ्या, मग मसाले-भात, मग पुन्हा एकदा जिलेबी (कुणाला पैजा मारायच्या असतील तर त्या ह्या फेरीत मारायच्या बरं का! ;), आणि शेवटी थोडा ताक-भात असा क्रम आहे. शिवाय मठ्ठ्याची अगदी रेलचेल आहे आणि मध्ये मध्ये पंचामृत, लोणची, कोशिंबिरी, कुरडया, पापड यांची ये-जा सुरूच आहे!
बरं का मंडळी, बसंतच्या लग्नात जेवणावळीची जबाबदारी, कुणाला काय हवं, नको ते पहायची जबाबदारी, मंडळींना जिलब्यांचा भरभरून आग्रह करण्याची जबाबदारी एका कुटुंबावर सोपवली गेली आहे. त्या कुटुंबाचं नांव आहे 'सारंग' कुटुंब! सारंग कुटुंबातली मंडळी चांदीच्या ताटातून जिलब्यांचा आग्रह करत आहेत.
आपल्या बसंतवरच्या प्रेमापोटी शुद्ध सारंग आणि गौड सारंग हे दोघे जातीने जेवणावळीची जबाबदारी सांभाळत आहेत!
शुद्ध सारंग! क्या केहेने...
या रागाची पटकन ओळख पटावी म्हणून हे ध्वनिमुद्रण ऐका. हा राग अगदी शांत स्वभावाचा आणि प्रसन्न वृत्तीचा. आपल्या आयुष्यातही अशी एखादी व्यक्ती असते/असावी. कधी ती आपल्या नात्यातली तर कधी मित्रपरिवारातली, किंवा ओळखीतली. आपल्याला कधी काही अडचण आली, मोकळेपणानी बोलावसं वाटलं तर अगदी खुशाल त्या व्यक्तीकडे जावं, मन मोकळं करावं. त्याच्या एखाद-दोन शब्दातच आपल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतात आणि मन शांत होतं. त्या व्यक्तीचा अगदी हाच स्वभावविशेष शुद्ध सारंगातही आपल्याला दिसतो.
मंडळी, फार उच्च दर्जाचा शुद्ध सारंग ऐकायला मिळाला अशा काही केवळ अविस्मरणीय मैफली माझ्या खात्यावर जमा आहेत. त्यात आवर्जून उल्लेख करावा लागेल तो आमच्या दातारवुवांचा. पं डी के दातार! व्हायोलिन वादनातला फार मोठा माणूस. एकदा त्यांच्या सकाळच्या एका मैफलीला जाण्याचा सुयोग मला आला होता. मैफल संपतच आली होती. दुपारचे साडे-बारा, एक वाजला असेल, आणि एकदम बुवांनी शुद्धसारंगातली एक गत सुरू केली. काय सांगू मंडळी तो अनुभव! एकदम लयदार आणि सुरेल काम हो. मध्यलयीतल्या रूपकाच्या ठेक्यात काय सुरेख चालला होता शुद्ध सारंग! ओहोहो, क्या केहेने! आम्ही श्रोतेमंडळी अक्षरश: शुद्धसारंगाच्या त्या सुरांत हरवून गेलो होतो. अशीच मालिनीबाईंची एक मैफल आठवते. क्या बात है. मालिनीबाईंनी तेव्हा असा काही शुद्धसारंग जमवला होता की अंगावर आजही रोमांच उभे राहतात! फार मोठी गायिका. मालिनीबाईंकडून खूप खूप शिकण्यासारखं आहे.
हिराबाईंची शुद्ध सारंगामधली एक बंदिश येथे ऐका. किती सुंदर गायली आहे पहा. दोन मध्यमांची सगळी जादू आहे. तीन मिनिटांच्या या बंदिशीतली हिराबाईंची आलापी पहा किती सुरेख आहे, क्या बात है...सांगा कसं वाटतंय ऐकून!
एखादी सुरेखशी दुपार आहे, आपण निवांतपणे झाडाखाली बसलो आहोत, ऊन आहे पण आपल्यावर झाडाने छानशी सावली धरली आहे. समोर एखादा शांत जलाशय पसरला आहे आणि सगळीकडे अगदी नीरव शांतता आहे! क्या बात है..मंडळी, हा आहे शुद्ध सारंगचा माहोल, शुद्ध सारंगचा स्वभाव. शांत परंतु आश्वासक!!
शुद्ध सारंग रागातील गिंडेबुवांनी बांधलेल्या एका बंदिशीच्या या ओळी पहा किती सुरेख आहेत-
गगन चढी आयो भानू दुपहार
तपन भयी तनमनकी अति भारी
कदम्ब की छैया, छांडे कन्हैया
शुद्ध नाम सारंग बिराजे!
नामरूप दोऊपार हार
काय बात है! शुद्ध नामातला सारंग कसा विराजमान झाला आहे पहा. सूर्यमहाराज डोक्यावर तळपत आहेत आणि अशा वेळेस एखाद्या गर्द झाडाच्या छानश्या सावलीचा आसरा मिळावा, हा जो अनुभव आहे ना, तो शुद्ध सारंग रागातून मिळतो! मंडळी आयुष्यातही जर कधी अशी उन्हाची तलखली जाणवली, तर अगदी विश्वासाने आमच्या शुद्धसारंगाला शरण जा. जिवाला नक्कीच थोडा सुकून मिळेल याची हमी देतो...
राग गौड सारंग!
हा राग थोडा नटखट आहे बरं का मंडळी;) अहो याच्याबद्दल किती लिहू अन् किती नको! हा मूळचा कल्याण थाटातला. त्यामुळे काही शास्त्रकार याला 'सारंग' मानतच नाहीत. न मानेनात का! आमच्याकरता मात्र हा गौड सारंगच आहे. स्वभावाने कसा आहे बरं गौड सारंग हा राग?
या रागाची पटकन ओळख पटावी म्हणून पटकन हे ध्वनिमुद्रण ऐका. या रागात गायली जाणारी ही एक पारंपरिक बंदिश आहे,
बिन देखे तोहे चैन नाही आवे रे,
तोरी सावरी सुरत मन भाए रे..
आहाहा.. काय सुरेख अस्थाई आहे! आता अंतरा बघा काय सुंदर बांधलाय,
मगन पिया मोसो बोलत नाही,
तडप तडप जिया जाए रे..
अहो मंडळी काही नाही हो, ही त्या कृष्णाची सारी लीला आहे. 'बिन देखे तोहे चैन नाही आए रे'! खरं आहे. हा रागही अगदी तसाच आहे. कृष्णाच्या मुखाचं अवलोकन केल्याशिवाय गोपींना चैन पडत नाहीये. आणि म्हणून त्या गोपी त्याबद्दल लाडिक तक्रार करत आहेत. ही लाडिक तक्रार म्हणजेच आपला गौडसारंग हो.
बरं का मंडळी, ह्या गौडसारंग रागाच्या आरोह-अवरोहातच किती नटखटपणा भरलाय पहा. ना हा आरोहात सरळ चालतो, ना अवरोहात. आपण पुन्हा एकदा वरचा दुवा ऐकून पहा..
सा ग रे म ग प म ध प नी ध सां..!!
आहे की नाही गंमत! कसे एक आड एक स्वर येतात पहा ;)
आणि अवरोहात येताना पण तसंच...
सां ध नी प ध म प ग म रे ग
आणि रे म ग, प‌ऽऽ रे सा
ही संगती.. वा वा...
यातही दोन्ही मध्यमांची मौज आहे बरं का.
गौडसारंग ऐकलेल्या अविस्मरणीय मैफली म्हणजे किशोरीताईंची आणि उल्हास कशाळकरांची. अहो काय सांगू तुम्हाला मंडळी! माझ्या पदरात आनंदाचं आणि समाधानाचं अगदी भरभरून दान टाकलंय या गौडसारंगानी..!
मंडळी, वर आपण शुद्ध सारंगचा स्वभाव पाहिला. तो स्वभावाने थोडा बुजुर्ग आहे. ती सारंग कुटुंबातील एक सिनिअर व्यक्ती आहे असं म्हणा ना. पण गौड सारंग तसा नाही. तो घरातील तरूण मंडळींचा जास्त लाडका आहे. लाड करणारा आहे. एखादी गंभीर समस्या घेऊन जावी तर ती शुद्ध सारंगाकडे बरं का. पण 'कॉलेजातली अमुक अमुक मुलगी आपल्याला लई आवडते बॉस!' हे गुपित सांगावं तर आमच्या गौड सारंगाला! ;) तोच ते समजून घेईल!
पं बापुराव पलुसकर. ग्वाल्हेर गायकीवर विलक्षण प्रभुत्व असलेला, अत्यंत गोड गळ्याची देणगी असलेला एक बुजुर्ग गवई. बापुरावांनी गायलेली गौड सारंग रागातली एक पारंपारिक बंदीश येथे ऐका. बघा किती सुरेख गायली आहे ती! गौड सारंगाचं काय मोहक दर्शन घडवलं आहे बापुरावांनी! क्या बात है.. असा गवई होणे नाही, असा राग होणे नाही! किशोरीताईदेखील हीच बंदिश फार सुरेख गातात. अगदी रंगवून, लयीशी खेळत. अब क्या बताऊ आपको!!
वाड्याच्या एका खोलीत मालकंसबुवा जप करत बसलेले आहेत, एका खोलीत दरबारीचं कसल्या तरी गहन विषयावर सखोल चिंतन वगैरे सुरू आहे, एका खोलीत मल्हारबा स्वत:च किंचित बेचैन होऊन येरझारा घालत आहेत. तिकडे उगाच कामाशिवाय जाऊ नये! धमाल करायच्ये? मजा करायच्ये? तर मग त्याकरता आहेत आपले हमीर, नट, केदार, आणि आपल्या गौडसारंगासारखे राग!
मंडळी, खरंच किती श्रीमंत आहे आपलं हिंदुस्थानी रागदारी संगीत! केवळ अवीट. आपलं अवघं आयुष्य समृद्ध, संपन्न करणारं!
बसंतचं लग्न --भाग १२ (अहीरभैरव)
राम राम मंडळी,
आधींच्या भागात म्हटल्याप्रमाणेच बसंतच्या लग्नाची धामधूम सुरू आहे. मांडवात आता बर्‍याच रागरागिण्यांची गर्दी जमली आहे. प्रत्येकाचं सौंदर्य वेगळं, प्रत्येकाचा गोडवा वेगळी, प्रत्येकाची नजा़कत वेगळी!
ती कोण बरं व्यक्ति नुकतीच आली आहे? बसंत त्या व्यक्तिला वाकून नमस्कार करत आहे! चेहेर्‍यावर एक वेगळंच तेज आहे तिच्या! सुरेख पांढर्‍याशूभ्र वेषातली, मस्तकी केशरमिश्रित गंध लावलेली ती व्यक्ति बसंतला कौतुकाने आशीर्वाद देत आहे! कोण आहे बरं ती व्यक्ति?!
मंडळी, ती व्यक्ति म्हणजे राग अहीरभैरव! आपल्या हिंदुस्थानी अभिजात संगीतातील सकाळच्या प्रहरी गायचा एक विलक्षण प्रभावी आणि भारदस्त असा राग, राग अहीरभैरव!! मंडळी, तुम्हाला सांगतो, भल्या सकाळी अहीरभैरव ऐकण्यासारखं सुख नाही! खूप शुभ आणि मंगलदायी वाटतं. अहीरभैरव अक्षरश: तुमचं संपूर्ण व्यक्तिमत्वच भारून टाकतो, तुमच्या मनाचा संपूर्ण ताबा घेतो, इतके प्रभावी सूर आहेत त्याचे! माझ्या आजपर्यंतच्या श्रवणभक्तिमध्ये अनेक दिग्गजांचा अहीरभैरव ऐकण्याचं भाग्य मला लाभलं आहे त्यात किशोरीताईंचं नांव अगदी आवर्जून घ्यावं लागेल. किशोरीताई अहीरभैरवची मांडणी भन्नाटच करतात! क्या बात है....!
अहीरभैरव या रागाबद्दल क्या केहेने! या रागाबद्दल किती लिहू अन् किती नको! आपल्याला या रागाची थोडक्यात ओळख व्हावी म्हणून आयटीसी-एसआरए च्या संस्थळावरील हे क्लिपिंग ऐका. यात रागाच्या आरोह-अवरोहाची, रागाची पकड (रागस्वरूप) याची थोडक्यात ओळख करून दिलेली आहे. आणि त्यानंतर 'अलबेला साजन आये..' ही या रागात नेहमी गायली जाणारी पारंपारिक बंदिशही आपल्याला ऐकता येईल...
काय मंडळी, अजूनही या रागाची पुरेशी ओळख पटत नाहीये? मन्नादासाहेबांचं 'पुछो ना कैसे' हे गाणं ऐका. हे गाणं याच रागात बांधलेलं आहे! उत्तम लचीला आवाज लाभलेल्या, अभिजात संगीताची भक्कम बैठक असलेल्या आणि आवाजात अतिशय गोडवा भरलेल्या मन्नादांनी या गाण्याचं अक्षरश: सोनं केलं आहे. या गाण्याच्या सौंदर्यात गायक, संगीतकार, कवी, यांचा वाटा तर आहेच आहे परंतु अहीरभैरवासारख्या भारदस्त रागाचे स्वर या गाण्याला लाभले आहेत ही देखील या गाण्याची खूप मोठी जमेची बाजू म्हणावी लागेल!
हा राग मला एखाद्या साधूपुरुषासारखा दिसतो. विरागी वृत्तीचा. पण कसा आहे हा साधूपुरुष? हा नुसतीच जपमाळ घेऊन वैराग्याची भाषा करत नाही तर उलट 'आयुष्यातले सगळे भोग अगदी यथेच्छ भोगा परंतु चित्ती मात्र सतत वैराग्याचीच जाणीव असू द्या' हे सांगणारा आहे! मंडळी, अगदी नेमक्या शब्दात वर्णन करायचं म्हटलं तर
'आहे मनोहर तरी गमते उदास!'
अश्याच वृत्तीचा हा राग आहे असं मला वाटतं!
मला हा साधूपुरुष थोडा प्रवासी, भटक्या वृत्तीचा, एका जागी फार वेळ न थांबणारा वाटतो. हा अवचित कधी दाराशी येईल आणि 'सांगेन गोष्टी युक्तिच्या चार..' या न्यायाने आपल्यालाच आयुष्य सावरणारे चार प्रेमळ सल्ले देईल आणि पुन्हा कुठेतरी दूर निघून जाईल!
वर उल्लेख केल्याप्रमाणे या रागात गायली जाणारी 'अलबेला साजन आये..ही पारंपारिक बंदिश इथे ऐका आणि पाहा. 'हम दिल दे चुके सनम' या चित्रपटात संगीतकाराने या बंदिशीचा खूप छान उपयोग करून घेतला आहे. गाण्याचं पिक्चराझेशनही खूप चांगलं आहे! विक्रम गोखले गुरुजी ऐश्वर्याला आणि सल्लूबाबाला या रागाची तालीम देत आहेत!
(अवांतर - हा शिणेमाही मला खूप आवडला होता! असो..)
मंडळी, माणसाचं मन हे अनेक गोष्टींनी भरलेलं असतं. त्यात आनंद असतो, दु:ख असतं, लोभ, मत्सर, माया, ममता, अगदी सारं काही असतं. परंतु या सगळ्या भावभावानांकडे शेवटी एका विरागी वृत्तीनेच पाहावं, किंबहुना मनातील प्रत्येक भावभावनेला विरागी वृत्तीची झालर असावी, असंच अहीरभैरव हा राग आपल्याला सांगतो किंवा शिकवतो. मग ती भावभावना कुठलिही असो, आनंद असो वा दु:ख असो, अंगी जर मूलभूत विरागी वृत्ती असेल तर या सगळ्या भावनांचा समतोल योग्य रितीने राखला जातो आणि ही विरागीवृत्ती आपल्याला अहीरभैरवकडून मिळते असं मला वाटतं. 'आयुष्यात सगळं काही कर परंतु शेवटी वृत्ती मात्र विरागीच ठेव' असंच हा राग सतत सांगत असतो आणि हीच या रागाची फार मोठी ताकद आहे असं मला वाटतं! मंडळी, मी काही कुणी मोठा धर्माचा गाढा अभ्यासक नाही की मोठमोठे ग्रंथ पठण केलेला, गीता-ज्ञानेश्वरीचा अभ्यास केलेला कुणी शास्त्री-पंडित नाही. आपलं हिदुस्थानी रागसंगीत हीच आमची गीता आणि त्यातले एकापेक्षा एक मौल्यवान असे राग हेच आमचे वेद! आणि हेच वेद व गीता आम्हाला बरंच काही शिकवून जातात असा माझा तरी अनुभव आहे!
मंडळी, खरंच मला तरी अहीरभैरव असाच दिसला, असाच भावला!
मंडळी अहीरभैरव रागाच्या व्यक्तिमत्वाकडे पाहताना मला नेहमी भाईकाकांच्या 'तुझे आहे तुजपाशी' या नाटकातलं काकांजींचं व्यक्तिमत्व आठवतं! हे काकाजी म्हणजे वर वर पाहता अगदी जिंन्दादिल, बाईबाटलीपासून ते आयुष्यातल्या सर्व गोष्टींचा यथेच्छ आस्वाद घेणारं, आयुष्यावर, खाण्यापिण्यावर, गाण्यावर मनमुराद प्रेम करणारं असं व्यक्तिमत्व आहे. परंतु मी 'वर वर पाहता' हे शब्द अश्याकरता वापरतोय की मूलत: त्या नाटकातल्या 'श्याम' या तरूण पात्रासोबत गप्पा मारताना जवान होणारे काकाजी क्षणात हे सगळे भोग सोडून देऊन, "चला आचार्य, आपण दोघे आपले जंगलात जाऊन राहू. अहो या वयात पोरंसोरं देखील दाढ्या ओढतात!" असंही म्हणायला तयार असतात!
"मला लोकांनी आचार्य केला हो! लोक जणूकाही काठावर काठ्या घेऊन उभेच होते, मी जरा जवळ आलो की मला पुन्हा पाण्यात ढोसत होते. त्यांनाही नमस्कार करायला कुणीतरी बुवा हवाच होता!"
असा शेवटी भडभडून आक्रोश करणार्‍या आचार्यांना "शांत व्हा आचार्य!" असा धीर काकाजीच देतात! आचार्य त्यांना म्हणतात, "काय गंमत आहे पहा काकाजी, अहो आयुष्यभर मी शांतीचे पाठ बडबडत आलो परंतु शेवटी तुम्ही मला शांत व्हायचा सल्ला देताय! कारण तुम्ही शांत आहात!! तुम्ही आयुष्यभर सगळं काही केलं परंतु अंगाला काहीच लावून नाही घेतलं!"
शेवटी खरा वैरागी कोण? गीतेचे पाठ बडबडणारा आचार्य की आयुष्याचे सगळे भोग यथेच्छ भोगलेला काकाजी? हा प्रश्न प्रेक्षकांवर सोडून हे नाटक संपतं!
सांगायच मुद्दा पुन्हा तोच की, अहीरभैरव हा रागदेखील माणसाला नेमकी हीच वैरागीवृत्ती अंगी बाणवायला शिकवतो. आनंद, भोगापभोग, याला त्याची कधीच ना नाहीये!
'गुंतुनी गुंत्यात सार्‍या पाय माझा मोकळा!'
भटसाहेबांच्या या फार सुरेख ओळीत जो अर्थ सांगितला आहे, तोच अर्थ हा रागही सांगतो असं मला वाटतं!
खरंच मंडळी, आपलं रागसंगीत म्हणजे नुसते केवळ स्वर नव्हेत किंवा आरोहा-अवरोहाचं, चलनाचं व्याकरण नव्हे! तर या व्याकरणाच्या कितीतरी पुढे जाऊन हे रागसंगीत आपल्याशी संवाद साधतं! आपल्या मनातील भावभावनांचा ठाव घेतं आणि हेच माझ्या मते आपल्या रागसंगीताचं गमक आहे. अहीरभैरव हा राग मला जसा दिसला तसाच प्रत्येकाला दिसेल असंही नव्हे परंतु तो प्रत्येकाच्या थेट हृदयाशी काही ना काही संवाद साधेल, त्याला आपलंसं करेल एवढं मात्र निश्चित!
हिंदुस्थानी रागसंगीताचा हा अनमोल ठेवा आपण सर्वांनी मनसोक्त लुटला पाहिजे. ह्या ठेव्याची व्याप्ती एवढी अफाट आहे, एवढी अमर्याद आहे की कितीही जरी लुटला तरी तो जराही कमी होणार नाही, उलट आपण मात्र अधिकाधिक समृद्ध होऊ, संपन्न होऊ, श्रीमंत होऊ!
बसंतचं लग्न ही मालिका मी केवळ याच हेतूने लिहीत आहे. खरं सांगायचं तर ही मालिका म्हणजे माझ्या पदरचं काहीच नाही, मी फक्त एक माध्यम बनून हा रागसंगीताचा खजिना मला जसा भावला तसा मुक्तहस्ते आपल्यापुढे लुटायचं काम करतोय, हे माणिकमोती उधळायचं काम करतोय!
असो....
अहीरभैरवचा हा भाग मी रामुभैय्या दाते यांच्या जिन्दादिल स्मृतीस अर्पण करत आहे!
बसंतचं लग्न..१३ ( केदार )
राम राम मडळी,
बसंतच्या लग्नाचा सोहळा आता खरंच देखणा होऊ लागला आहे. यमन-भूपासारखी रागमंडळी सर्वांचं प्रेमानं स्वागत करत आहेत, सारंग मंडळी कुणाला काय हवं, नको ते पाहात आहेत, जेवणाची व्यवस्था त्यांच्याकडेच आहे. कोपर्‍यात कुठेतरी नंद, हमीर, कामोद यांची लग्नातल्या रागिण्यांसोबत माफक टवाळी चालली आहे, मुलतानी, तोडी, दरबारी, पुरिया, मल्हार, झालंच तर आमचे मालकंसबुवा, अहीरभैरव यांसारखी मातब्बर आणि बुजूर्ग मंडळी सर्वात पुढल्या कोचावर स्थानापन्न झाली आहेत. या बुजूर्गांना काय हवं,नको ते इतर खेळकर स्वभावाची राग मंडळी पाहात आहेत! देस सारखा राग यासर्वांची जातीने विचारपूस करतो आहे! एकंदरीत सगळी धमाल सुरू आहे, आनंदोत्सव सुरू आहे! आमच्या बसंतच्या लग्नाचा मंडप म्हणजे भारतीय अभिजात रागसंगीताची ती एक मांदियाळीच आहे!
भेदभाव अपने दिल से साफ कर सके
दोस्तोसे भूल हो तो माफ कर सके
झूठसे बचे रहे, सच का दम भरे
दुसरोंके जयसे पेहेले खुद को जय करें!

पण बरं का मंडळी, एका रागाचा उत्साह मात्र अगदी ओसंडून वाहतो आहे. त्याच्या लाडक्या बसंतला कुठे ठेवू अन् कुठे नको असं त्याला झालं आहे! हा सोहळा कधी संपूच नये असंच त्याला वाटतं आहे. अतिशय उत्सवप्रिय व्यक्तिमत्व आहे या रागाचं! नव्हे, तर हा राग म्हणजे स्वरांचाच उत्सव आहे असं मी म्हणेन!
हा राग आहे, केदार! मंडळी, केदार म्हणजे साक्षात स्वरोत्सव, केदार म्हणजे आनंदाचं निधान! केदार म्हणजे रसिकता, केदार म्हणजे तारूण्य, केदार म्हणजे शृंगार! केदार म्हणजे हळवेपणा! अहो किती संपन्न व्यक्तिमत्व असलेला राग आहे हा! विलक्षण जादुई स्वरवेल लाभलेला हा राग अक्षरश: एका क्षणात मैफलीची पकड घेतो असा माझा अनुभव आहे!
केदारचं प्राथमिक स्वरूप, आरोह-अवरोह, पकड, इत्यादी तांत्रिक गोष्टी समजून घेण्यासाठी कृपया हे ऐका. ह्यात आग्रा घराण्याच्या गुणी गायिका शुभ्रा गुहा यांनी 'कंगनवा मोरा..' ही केदारातली पारंपारिक बंदिश किती छान म्हटली आहे पाहा!
केदार रागातलं, मधलं 'हमको मन की शक्ति देना' हे अतिशय लोकप्रिय गाणं इथे ऐका. गुड्डी चित्रपटातील हे फार सुरेख गाणं आहे.
मंडळी, इथे संगीतकार वसंत देसायाना दाद द्यायला हवी! केदार हा बहुरंगी व्यक्तिमत्वाने नटलेला राग आहे त्यामुळे या गाण्यातल्या अर्थालाही हा राग साजेसाच ठरतो. कुणाबद्दलही मनामध्ये भेदभाव नसलेल्या केदारकडे क्षमाशील वृत्ती मात्र पुरेशी आहे!
मी धर्माचे केले पालन
वाली वध ना, खलनिर्दालन!

"जाओ, साला तुम्हे माफ किया!" असं खुल्या दिल्याने म्हणण्याचा स्वभाव आहे आमच्या केदारचा!
वसंत देसायांनी 'दुसरोंके जयसे पेहेले खुद को जय करें!' या अवघ्या एका ओळीत केदारचं एक संपूर्ण सारांशरूप किती छान ठेवलंय बघा! मध्य षड्जापासून ते तार षड्जापर्यंत केदार किती सहजतेने बागडतो बघा. वाटेतल्या प्रत्येक स्वरावर अगदी मनमुराद प्रेम करत करत याच्या आरोहा-अवरोहाची यात्रा सुरू असते!
जयपूर घराण्याच्या तरूण, गुणी गयिका सौ अश्विनी भिडे यांनी गायलेली केदारातली 'चतर सुगर बलमा' ही बंदिश इथे ऐका. यातल्या केदाराचं सौंदर्य किती मोहक आहे पाहा! 'साला अपनेही मस्तीमे कोई जा रहा है' असं वाटतं! ज्याला खर्‍या अर्थाने 'Rich!' म्हणता येईल असं या बंदिशीचं स्वरूप आहे.
वसंतरावांनी केदारकडे कसं बघितलंय त्याची झलक इथे ऐका. वसंतरावांसारख्या बुद्धीमान गवयाला केदाराने भुरळ घातली नसती तरच नवल होतं! वसंतरावांचा स्वभावही तसाच होता, केदार सारखाच दिलदार आणि अवलिया!
बापुराव पलुसकर! घराणेदार गायकीतल्या ग्वाल्हेर परंपरेतलं एक मोठं नांव. अवघ्या ३३-३४ वर्षांच्या आयुष्यात बापुरावांनी गाण्यात जे काम करून ठेवलं आहे ते पाहिलं की मन थक्क होतं! खडीसाखरेसारखा सुमधूर आवाज, तालासुरालयीवर विलक्षण हुकुमत असलेल्या बापुरावांच्या गायकीत सदाबहार ग्वाल्हेर परंपरेतली सगळी वैशिष्ठ्य अगदी पुरेपूर होती. दुर्दैवाने बापुरावांना फारसं आयुष्य लाभलं नाही! असो, बापुरावांनी गायलेली 'कान्हा रे..' ही केदारातली पारंपारिक बंदिश इथे ऐका!
धमाल करा, मजा करा, उत्सव साजरे करा! पण,
Whatsoever, but no guilty at all ! असा आहे आपला केदार!
हे सांगतांना बाबूजींनी किती मुक्तपणे केदारच्या रंगाची उधळण केली आहे! आहाहा, क्या बात है. अहो गीतरामायणातलं हे किती सुंदर गाणं आहे केदरातलं! मरत्या वालीला राम सांगतोय,
"हो, मी मारलं तुला झाडाआडून! काय म्हणणं आहे तुझं? अरे तुझ्या बाबतीत कसली आल्ये निती आणि अनिती?"
तू तर पुतळा मूर्त मदाचा
सुयोग्य तुज हा दंड वधाचा
अंत असा हा विषयांधाचा!

असं उघडपणे सांगायला केदारचेच सूर हवेत मंडळी! आणि बाबूजींसारखा असामान्य प्रतिभावानच त्या रागाची निवड करू जाणे! मी जेव्हा या गाण्यातील केदाराशी आणि माझ्या मनातल्या केदाराशी तुलना करू लागलो आणि एकिकडे गाण्याचा अर्थही लक्षात घेऊ लागलो, तेव्हा बाबूजी माझ्या मनातला केदार मलाच अधिक स्पष्ट करून सांगताहेत असं वाटलं, समोर बसवून शिकवताहेत असं वाटलं!
दिधले होते वचन सुग्रिवा,
जीवही देईन तुझिया जीवा!

या ओळीतलं मैत्र केदारपेक्षा कोण अधिक चांगल्याप्रकारे व्यक्त करू शकणार?!
अंत्य घडी तुज ठरो मोक्षदा
सांभाळीन मी तुझ्या अंगदा
राज्य तुझे हे, ही किष्किंधा
सुग्रीवाच्या करी समर्पण!

आणि एवढं होऊनही केदारच्या मनाची श्रीमंती जराही कुठे कमी झाली नाही, त्यात जराही कुठे कोतेपणा नाही, की जराही कुठे दुराभिमान नाही, की अहंपणचा, जेतेपणाचा स्पर्श नाही! राम वालीला सांगतो की मी तुला मारला खरा, पण तुलाही मोक्षच मिळो लेका! आणि काळजी करू नको, तुझ्या पुत्राला, अंगदालाही मी सांभाळीन, तुझे राज्य तुझ्याच घराण्याच्या सुग्रीवाच्या हवाली करीन. मी खाणार नाही!
-- तात्या अभ्यंकर.
वैर, वैराच्या जागी आणि नितीमत्ता, नितिमत्तेच्या जागी! मंडळी, हे उघडपणे, खुल्या दिलाने सांगायला केदारच हवा! आपल्याला काय वाटतं?
असो...!
मी जेव्हा एक व्यक्ति म्हणून केदारकडे बघतो तेव्हा मला असं जाणवतं की मी मोठ्या उदार मनाच्या व्यक्तिकडे पहात आहे. छोटेपणाचा, अशुभतेचा कधी स्पर्शच झालेला नाही या व्यक्तिला! प्रत्येक माणसाच्या आयुष्यात केदरासारखा एखादा तरी सखा असावा असं वाटतं! अगदी सखा नाही, तरी केदाराइतकी मोठ्या मनाची एखादी तरी वडीलधारी व्यक्ति अगदी प्रत्येकाला लाभावी, जिच्याकडे अगदी खुलेपणानं मनातलं बोलता यावं, आपले सगळे लाड पुरवून घेता यावेत, अणि प्रसंगी जिच्या मांडीवर डोकं ठेवून मनमोकळं रडताही यावं!
कारण एकदा मनमोकळं रडून घेतलं की मन अगदी स्वच्छ होतं, आकाश पुन्हा एकदा निळं, निरभ्रं होतं आणि माणूस पुन्हा एकदा केदारासोबत त्याच्या त्या उत्सवप्रिय, मंगलदायी वातावरणात केदारच्या सुरात न्हाऊन निघतो, केदारच्या रंगात गाऊ लागतो!
आणि कुणी सांगितलं की माणसं फक्त दु:खातच रडतात? अहो दु:खाश्रू तर नैसर्गिकच असतात परंतु आनंदाश्रूंचंच कित्येकदा अधिक ओझं वाटतं! दु:खी मनाला आवरण्यापेक्षा हळव्या मनाला आवरणं अधिक मुश्कील! माणसाच्या मनातील या सगळ्या भावभावना समजून घेणारा आणि त्याला सतत पुढे जात रहायला शिकवणारा केदारसारखा दुसरा सखा नाही मंडळी!
तात्या अभ्यंकर.
बसंतचं लग्न..१४ ( 'देस' )
राम राम मंडळी,
आमच्या बसंतचं लग्न अगदी दृष्ट लागेल असं सुरू आहे बरं का! एकापेक्षा एक दिग्गज असे राग स्थानापन्न झाले आहेत. वेगळ्यावेगळ्या भरजरी स्वरांनी, सुरावटींनी, राग-रागिण्यांच्या सौंदर्यानी आता तो मंडप नटला आहे. मोठमोठ्या रागांची गळाभेट होते आहे. मुलतानी, मल्हार सारखे दिग्गज राग मालकंसासारख्या योग्याची आदबीने विचारपूस करत आहेत. तर कुठे नट, हमीर, केदारासारखी जवान मंडळी बुजुर्ग अशा आमच्या दरबारीला काय हवं नको ते विचारत आहेत! यमन सगळ्यांना हळवेपणाने भेटतो आहे तर तोडीच्या चेहेर्‍यावरूनही उगाचंच थोडीशी स्मितहास्याची रेषा उमटते आहे! अहो आपल्या हिंदुस्थानी रागदारी संगीताची श्रीमंती वर्णावी तरी किती?
"पिया कर धर देखो धडकत है मोरी छतिया!"
पण, त्या रागदारीच्या मांदियाळीमध्ये एक 'देस' नावाचा पाहुणाही आहे बरं का! बसंतच्या लग्नाचा आनंद, रागदारीतली इतर भावंडं भेटल्याचा आनंद अगदी ओसंडून वाहतोय त्याच्या चेहेर्‍यावरून!
राग देस! कसं आहे हो या देसचं व्यक्तिमत्व?
आपला देस तसा हळवा आहे, प्रेमळ आहे, वृत्तीने अगदी रसिक आहे, अन् मोठ्या मनाचा आहे! परंतु स्वभावाने मात्र तसा प्रवाही आहे. एके ठिकाणी फार वेळ थांबणं, गुंतून राहणं त्याच्या स्वभावात नाही. याच्यात सतत पुढे जाण्याची अत्यंत उत्साही वृत्ती आहे.
देस रागाचं स्वरूप पटकन लक्षात येण्यासाठी हे क्लिपिंग ऐका. आग्रा गायकीतल्या माझ्या आवडत्या गायिका शुभ्रा गुहा यांचं हे किल्पिंग आहे. खूप छान आहे ही बंदिश!
देवगंधर्व भास्करबुवा बखले! ग्वाल्हेर, आग्रा, व जयपूर या घराण्यांवर अनन्यसाधारण हुकुमत असलेला एक दिग्गज गवई, त्याचसोबत मराठी संगीतरंगभूमीवरचा एक दिग्गज संगीतदिग्दर्शक. शैला दातार या त्यांच्या नातसूनेने गायलेली आपल्या हिंदुस्थानी रागसंगीतातली,
ही एक अतिशय लोकप्रिय बंदिश इथे ऐका. आहाहा, काय सुरेख बंदिश आहे! भास्करबुवांच्याच शिष्य परंपरेतले मास्तर व त्यांचे शिष्योत्तम संगीतभूषण पं राम मराठेदेखील ही बंदिश फार अप्रतीम गायचे. पण भास्करबुवा एवढ्यावरच थांबले नाहीत. पुढे जाऊन त्यांनी याच बंदिशीवर आधारीत संगीत स्वयंवरात काय सुंदर नाट्यपद बांधलं पाहा -
"मधुकर वन वन फिरत करी गुंजारबाला"
आणि अहो साक्षात नारायणराव बालगंधर्वांच्या स्वरांचा परिसस्पर्श झाला या पदाला! आणखी काय पाहिजे?! सुजन कसा मन चोरी, नाथ हा माझा, मधुकर वन वन अशी एकापेक्षा एक सरस पदं भास्करबुवांनी बांधावीत आणि नारायणराव बालगंधर्व या त्यांच्या शिष्योत्तमाने आपल्या स्वर्गीय स्वरांनी ती अजरामर करावीत! भास्करबुवा-बालगंधर्वांची किती थोर शिष्यपरंपरा आहे ही! मन भरून येतं!
मंडळी, आपली सर्वांचीच पूर्वपुणाई म्हणून या देस रागात अजून एक अप्रतीम गीत जन्माला आलं आणि तुमचेआमचे कान अगदी तृप्त झाले!
उदास का तू, आवर वेडे नयनातील पाणी
लाडके कौसल्ये राणी!

महाराष्ट्रवाल्मिकी गदिमांच्या सिद्ध लेखणीतून हे शब्द उतरले आणि ते वाचतावाचताच स्वरगंधर्व बाबूजींच्या मनात देस रुंजी घालू लागला आणि एक अप्रतीम गाणं जन्माला आलं. मंडळी, या गाण्याला दाद देतांना गदिमांबाबूजींइतकीच आमच्या देसलाही दाद द्यायला विसरू नका बरं का!
रुपास भाळलो मी,
भुललो तुझ्या गुणांना
मज वेड लाविले तू
सांगू नको कुणाला!

क्या बात है! प्रेम करणार्‍या दोन जिवांतलं हे गूज देसमध्ये ऐकायला किती सुंदर वाटतं, तरल वाटतं! क्या बात है वसंत पवारसाहेब! जियो...!
वसंत आला तरुतरूवर, आली नवपालवी
मनात माझ्या उमलून आली तशीच आशा नवी
कानी माझ्या घुमू लागली सादावीण वाणी, लाडके कौसल्ये राणी...
ती वाणी मज म्हणे दशरथा, अश्वमेध तू करी,
चार बोबडे वेद रांगतील तुझ्या धर्मरत घरी
विचार माझा मला जागवी, आले हे ध्यानी, लाडके कौसल्ये राणी....
खरंच मंडळी, अहो ह्या देसमुळे मन प्रसन्न होतं अगदी! मनातले सगळे विकार नाहीसे करण्याची ताकद आहे याच्यात!
वसंत पवारांसरखा संगीत दिग्दर्शक आणि आशाताई-बाबुजींसरखे गायक एकत्र येतात आणि देस रागातलं एक केवळ अन् केवळ अप्रतीम गीत जन्माला येतं! कोणतं गीत?
एकान्त पाहुनिया,
जे तू मला म्हणाला,
ऐकून लाजले मी
सांगू नको कुणाला!
"सुखदां वरदां मातरम्, वन्दे मातरम् !"
काय ओळखलंत का मंडळी? अहो हा पण देसच की! अहो हा तर हा आपल्या देशाचा देस!  उत्तर ते दक्षिण आणि पूर्व ते पश्चिम अखंड भारताला एका सूत्रात बांधून ठेवायची अजब किमया साधली आहे देस मधल्या या राष्ट्रगीताने! या गीतातील देसच्या स्वरात आपल्या भारतीयांच्या संस्कृतीची, परंपरांची अन् सभ्यतेची, उत्सवप्रियतेची एक छानशी सावली दिसते! आणि म्हणूनच भारताच्या स्वातंत्र्यवर्षाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षात आमच्या अण्णांसारख्या दिग्गज गवयाचे 'वन्दे मातरम्'चे सूर संसदेत उमटतात, मनात देसप्रेम आणि देशप्रेम दोन्हीही जागृत होतं आणि जीव धन्य होतो!
"बजे, सरगम बजे,
हर तरफसे सरगम बजे, गुंज बनके देस राग!"

आत्ताही माझ्या कानात काही वर्षांपूर्वी दूरदर्शनवर अण्णांनी गायलेल्या,
ह्या गाण्याचे स्वर रुंजी घालत आहेत....!
-- तात्या अभ्यंकर.

2 comments:

  1. तात्या, अहो तुम्ही कसले आभार मानताय. ऋणात तर आम्ही आहोत तुमच्या. निरंतर इतके सुंदर लेखन करूण वर ते मला माझ्या ब्लॉगवर पोस्ट करायची परवानगी दिल्याबद्दल खरे तर मीच प्रचंड ऋणात आहे तुमच्या आणि प्रामाणिकपणे सांगतो या ऋणात आजन्म राहायला आवडेल मला. धन्यवाद. :)

    ReplyDelete