Tuesday, October 8, 2024
माय गेली दूर गावा...
कोण येते कोण जाते ध्यान थोडे देत आलो
आसवांना नेहमी आव्हान थोडे देत आलो
या जगाला त्या जिवाचे वाटले ओझे कधी ना
ईश्वराला भावनांचे दान थोडे देत आलो
आज परके प्राण झाले वाढला नकळत दुरावा
सोयरे व्हावेत म्हणुनी भान थोडे देत आलो
विठ्ठला, कां गौण ठरते माणसाचे मौन येथे?
मी स्वतःला अक्षरांचे ज्ञान थोडे देत आलो
माय गेली दूर गावा थांबले घन उंबऱ्यावर
आटलेल्या पापण्यांना प्राण थोडे देत आलो
© विशाल कुलकर्णी
#आई
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment