Friday, November 6, 2015

.... तो कृष्ण 'एकटा' होता !

कालिंदीच्या तटी नाचते राधा, गोपरास सावळा
वेडावुन गेल्या गोपी, अंबरात श्यामरंग उधळला
गोकुळ झाले मग्न, दंग, हर...; नामात हरीच्या गुंग
हर मिठीत सांवळकान्हा , तृप्त शृंगार प्रितीचा रंग
पण वृन्दावनचा राणा
..... तो कृष्ण 'एकटा' होता !
चाणूर, मुष्टिक, कंसही वधिला, उद्धरली मथुरा
चन्दन गंधीत झाली कुब्जा कृष्ण एक तो उरला
ब्रज, वृन्दावन, गोकुळ, मथुरा अन द्वारकामैय्या
अद्वैताला उजळून गेली, केशवा तव सावळमाया
विश्व डोलते ज्या मुरलीवर..
...... तो कृष्ण 'एकटा' होता !
धुर्त शकुनी, विषयी कौरव, षंढ सभागृह ठरले
सर्वस्व हरवून बसले पांडव पतीधर्मही विसरले
भीष्म, विदुर ते स्तब्ध, शापदग्ध हस्तिनापुरी
सखी द्रौपदी त्रस्त मंडपी, त्राता झाला श्रीहरी
कृष्णेसाठी स्वये धावला ,
...... तो कृष्ण 'एकटा' होता !
कुरुक्षेत्रावर डाव मांडूनी उद्धरीले कुरु कुल सारे
गतीमुढ पार्था बोध, जगाला सांगितली त्वां गीता
कर्तव्यबोध तो होता सरली शामसख्याची माया
व्याधाने धरीला नेम, सोडला बाण, छेदली काया
संपले पर्व सुटला देह...
..... तो कृष्ण 'एकटा' होता !
विशाल कुलकर्णी
१८-०९-२०१५

No comments:

Post a Comment