Friday, September 16, 2016

आता नव्याने ...

शोधतो मौनात कविता, वाहणे आता नव्याने
मूळ अस्तित्वास फिरुनी शोधणे आता नव्याने

कोणत्या त्या राऊळी वसतो हरी सांगा गड्यांनो
माणसांच्या अंतरी डोकावणे आता नव्याने

भूक, तृष्णा, वासनाही वाटती कां क्षुद्र आता?
अस्मितेला मृगजळी धुंडाळणे आता नव्याने

तू मला गोंजारणेही सोडले आहे अताशा
वंचनांचे खर्चही पडताळणे आता नव्याने

माणसांना शोधतो मी श्वापदांची कोण गर्दी
लष्कराच्या भाकरी बघ भाजणे आता नव्याने

मोल भक्तीला न उरले, 'जा'च तू येवू नको रे
विघ्नहर्त्या हात जोडुन मागणे आता नव्याने

विशाल कुलकर्णी
१६-०९-२०१६

No comments:

Post a Comment