Tuesday, January 16, 2018
तरही गझला
नाव कुठल्या ईश्वराचे घ्यायचे नव्हते मला
श्रेय माझ्या धाडसाचे द्यायचे नव्हते मला
स्वार्थ जपतो मीच माझा मज नको मोठेपणा
मानवी मी, संत वेड्या व्हायचे नव्हते मला
मी हरीच्या पायरीवर पीर होता रेखिला
मंदिरी वा मस्जिदीला जायचे नव्हते मला
राग कुठला विसरलो मी, चाल ना स्मरते मला
जीवनाचे गीत भेसुर गायचे नव्हते मला
तोच रस्ता, त्या दिशांचे का नकाशे बाळगू?
या दिशेला एकदाही यायचे नव्हते मला
मी भिकारी आज ही तर, वाट ती माझी उद्या
राज्य विश्वाचे तुझ्या राखायचे नव्हते मला
© विशाल कुलकर्णी
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment