Saturday, June 30, 2018

अभंग पावसाचे ....



साजिरे ते ध्यान
होतसे व्याकुळ
लागता चाहूल
पावसाची !

फुले मौक्तिकाची
तृणावरी दंव
मनी एक भाव
आनंदची !

झणी होय गंगा
झणी चंद्रभागा
उन्ह ओल्या रांगा
डोळ्यातुनी !

ओढ त्यां धरेची
कसे घन निळे
कधी चिंब ओले
सावळाले !

बरसावे ढग
डोळा नीर वाहे
साकळूनी राहे
प्राक्तनाचे !

आरक्त क्षितिजा
निळी होत जाते
जणु मेघ होते
पान्हावले !

शुष्क माळरानी
थेंब पावसाचा
स्पर्श परिसाचा
मृगजळ !

मंदिर पडके
नदीतीरावर
त्या कळसावर
जळ निळे !

तुची माझा विठू
तू जगदीश्वर
तू जलधीश्वर
विशू म्हणे !

© विशाल कुलकर्णी

No comments:

Post a Comment