Friday, June 22, 2018

पाऊस


पानोपानी तरुवेलींची
घेत चुंबने सुटला पाऊस
स्पर्शाने मोहरली वसूधा
गात्रोगात्री रुजला पाऊस

अंगोपांगी ओज गवताच्या
कुठेकुठे तो शिवला पाऊस
दंवबिंदुचा मग ढळला तोल
कुशीत त्यांच्या शिरला पाऊस

स्त्रवते धरित्री दुग्ध सुखाचे
पोर होवूनी लुचला पाऊस
वेल जुईची सुखे आकसली
प्रीत होवुनी भिडला पाऊस

कुठे बळीची कढत्त आंसवे
शीतल करण्या थिजला पाऊस
जित्राबांची गात्रे थरथरली
अश्रुत कुणाच्या भिजला पाऊस

सुख-दुःखाच्या हिंदोळ्यावर
तृप्त होवून झुलला पाऊस
थांबुन जरा तू ऐक पावसा
डोळ्यातुन बघ झरला पाऊस !

© विशाल कुलकर्णी

No comments:

Post a Comment