Wednesday, August 29, 2018

भिंती

भिंती

बांगड्या फुटतील तेव्हा एकट्या होतील भिंती
माणसे मग मौन धरतिल पोरक्या होतील भिंती

कोरडा हा गाव येथे मोगराही लाल असतो
बघ जरा हासून तूही बोलक्या होतील भिंती

रंग रक्ताचा सदा आरक्त असतो सत्य आहे
हात पसरुन साद दे मग मोकळ्या होतील भिंती

देव असतो आणि नसतो, माणसे असतील सोबत
तू जरा माणूस हो मग सोयऱ्या होतील भिंती

खोल दरवाजे मनाचे अंतरीच्या शोध सत्या
विरघळावे द्वैत सारे दार त्या होतील भिंती

© विशाल कुलकर्णी

No comments:

Post a Comment