Tuesday, September 4, 2018
...... मिटून डोळे
पहात असतो परवड सगळी मिटून डोळे
सहन करावी तडफड सगळी मिटून डोळे
नभात असतो म्हणे कुणी देव जागलेला
करत रहावी धडपड सगळी मिटून डोळे
मनास कळते मुकेपणाची अबोल भाषा
उगाच का हो बडबड सगळी मिटून डोळे?
कुणास ठावे कधी अचानक दिसेल मृत्यू
उरात तोवर धडधड सगळी मिटून डोळे
उपासपोटी कुणी छकूली मुकाट बसते
कशी सहावी रडरड सगळी मिटून डोळे
उभा विटेवर विठू कधीचा उदासवाणा
पहात राही पडझड सगळी मिटून डोळे
© विशाल कुलकर्णी
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment