Tuesday, September 29, 2020

ये सखये...

 


रात्रीस चांदण्याने

ओजाचे दान द्यावे

येता दिवस नवा

तुज नाव मम स्मरावे


त्या धुंद निर्झराचा 

गंधाळल्या नभाचा

श्वासास गंध यावा 

धुंदावल्या मिठीचा


तू भेटशी नव्याने 

मी ही नवाच आहे

नात्यास रंग यावा 

वेडावल्या जुईचा


विसरून वेदनेला

तृप्त ह्रदय व्हावे

सुप्त जाणिवांना

प्रेमाचे पंख फुटावे


तू चुंबशील का गे

श्वासांस धुंद ओल्या

स्वप्नांस मोह व्हावा 

ओलावल्या दिठीचा


हलकेच तू स्मरावे

गाणे पुन्हा सुखांचे

तुजला विसर पडावा 

त्या सुप्त आसवांचा


ही घडी वयात येता

मग आमंत्रणे सुखांची

आनंद मग पहावा 

या नादावल्या मनाचा


मग तृप्त अंतराला 

हळवे उधाण यावे

हॄदयास स्पर्श व्हावा

प्रितीच्या मोरपिसाचा 


ये सखये पुन्हा नव्याने

हे स्वप्न नवे जोजवू

ओल्या मिठीत पुन्हा..

मल्हार आज जागवू !


© विशाल कुलकर्णी




No comments:

Post a Comment