Tuesday, October 13, 2020

अनंता ...

तुझे सांगणेच पुन्हा खरे झाले

खऱ्याने वागणे बोचरे झाले

खोटे उगा बोलायचे कुणाला?

उसासे माझे मला पुरे झाले


नको आवरु संभ्रमाचे पसारे

किती या दिशांचे फसवे इशारे

फुकाचे दिलासे शोधी कशाला?

नको ना पुन्हा धुसराचे किनारे


अकस्मात कोणा नदीच्या तीरी

उदास वाजते हरिची बासरी

उगा दाटती कंढ उरी कशाला?

आता मौन होते पुन्हा वैखरी


जगाचे भुलावे पुरे हो आता

जरा वास्तवाचे द्या दान आता

असे दाटले तम दारी कशाला?

अता आवरा आशंका अनंता !


© विशाल कुलकर्णी


No comments:

Post a Comment