Monday, July 4, 2022

आगमन आनंदाचे

 

जलद काळे नीळेसावळे 

झाडे वेली निर्झर ओले

ओलेती नक्षी गुलबक्षी

क्षितिजावरती रंग पसरले


वाट पाहते धरा सावळी 

अधोवदन ती सखी बावरी

दंवबिंदूचे गंध कपाळी

ल्याली हिरवा साज लाजरी


रंगबावरी वसुधा पाहून

क्षणात हळवे नभ ओघळले

गवतफुलांची गाली लाली

मृदगंधाचे झरे उसळले


मी ती पाऊसवेडी नदी

मी श्रावणातला निर्झर तो

अंगोपांगी ओज सुखाचे

दुःखाचे अस्तित्व विसरतो


तो येता रंगाची उधळण

शेले हळव्या हिरवाईचे

सुखलोलुप मग होते काया

आगमन ओले आनंदाचे


© विशाल कुलकर्णी

No comments:

Post a Comment