Friday, March 7, 2025

नदी वाहते...

 

नदीच्या किनारी थवे पाखरांचे जणू अंबराला दिवे टांगलेले,

कुणी जोजवे त्या नदीच्या जळाला निळ्या पापण्यांवर उभे मेघ काळे.


कसे वाहते शांत ओढाळ पाणी कुठे वाट अडवून हसते लव्हाळे,

नदी थांबते भेटण्या मग तयाला सुखे दाटती नेत्र ओलावलेले.


नदीच्या उरी पाझरे तृप्त पान्हा जरी होतसे जळ तिचे सावळाले, 

जणू माय स्पर्शे सुखे पाडसाला तिच्या अंतरी मेघ पान्हावलेले.


कुणीसे नदीला खुणावून गेले तिचे काठ हलकेच लज्जित झाले,

तिला स्पर्शले मुग्ध वारे सुखाचे नदीचे जणू तृप्त आरक्त डोळे.


फुलांच्या कमानी तिच्या स्वागताला उभे वृक्ष ओळीत गंधाळलेले, 

नदी वाहते सागराच्या दिशेने तिला साजणाचे पिसे लागलेले.


© विशाल कुलकर्णी 



(P.C.: Internet)

No comments:

Post a Comment