Friday, March 29, 2019

अधीर ...



नार उभी सकवार नदीवर
घट डोईवर कुंतल काळे
गालावरती खळी कोवळी
अन पदराचे भलते चाळे

नजर तिची क्षितीजावरती
भाळावर सुकुमार आठी
कुठे राहिला साजण वेडा?
उभी राधिका त्याच्यासाठी

पाठीवरती नागिण काळी
वाऱ्यासंगे सूखे लोंबते
कोमल काया अधीर डोळे
त्या डोळ्यातून लाज सांडते

हात कटीवर मुरड ओठाला
वाट पाहुनी जीव शिणला
कशास देतो भलत्या शपथा?
त्या शपथेवर जीव टांगला

© विशाल कुलकर्णी

No comments:

Post a Comment