Friday, March 23, 2018

रुढींचे ढिगारे वहाणे कशाला



रुसावेस तूही नव्याने कशाला
पुन्हा आठवावे बहाणे कशाला

मिजासी फुलांच्या किती जोजवाव्या
'उगी' कंटकाने रहाणे कशाला

घडवतात वेडेच इतिहास येथे
हवे त्यास कोणी शहाणे कशाला

खुळी पोर माझी मुक्यानेच रडते
भरू कागदाचे रकाने कशाला

गड्या भाकरीचा हवा चंद्र आम्हा
नभी तारकांना पहाणे कशाला

नसातून वाजे श्रमाचेच गाणे
हवे मारव्याचे तराणे कशाला

किती चौकटींचे पहारे मनावर
रुढींचे ढिगारे वहाणे कशाला *

गळां माळतो मी नभातील तारे
जळावे उगा माणसाने कशाला *

भुजंगप्रयात
• : इथे वृत्तासाठी सुट घेतलेली आहे

© विशाल विजय कुलकर्णी

No comments:

Post a Comment