Sunday, April 1, 2018

लेक ...



सोनसावळी स्वप्ने सगळी सुखेच लेवुन आली
सोनपावले कुणा परीची हळुच उमटली दारी

कुणी रेखिल्या त्या गालावर मोरपिसांच्या ओळी
गाल गोबरे, गोड गुलाबी राजकुमारी प्यारी

नाजुक काया प्राजक्तासम कुरळे कुंतल भाळी
अप्सरा कुणी, शापभ्रष्ट ती मदनशराची स्वारी

लेक असावी एक गोडशी नको धनाच्या राशी
कुशीत घेवुन तिज सांगावी रोज कहाणी न्यारी

हातात तिचे बोट कर्दळी जबाबदारी खाशी
कोण परी ही? वळता नजरा, सुख वाटावे भारी

तिने रुसावे, रुसुन बसावे, कासाविस मी व्हावे
डोळ्यात तिच्या मला दिसावी माझी सौख्ये सारी

वृत्त : लवंगलता (  मात्रा : 8 8 8 4 )
© विशाल कुलकर्णी



No comments:

Post a Comment