Friday, September 21, 2018

जमाखर्च

जमाखर्च

हे दिवसही जातील निघून
अगदी सहजपणे,
मागे वळूनही न पाहता.
जणूकाही...
आलंच नव्हतं,
हे वळण त्यांच्या वाटेवर !
विसरून जातील,
अगदी निर्ममपणे ...
तुझ्या-माझ्या भेटीचे शुष्क संदर्भ
तू ठेवशील कदाचित जपून
तथाकथित स्मृतींची मोरपिसे वगैरे..
मला नाही जमायचं ते !
माझं नातं नेहमीच वास्तवाशी,
वास्तवाच्या विस्तवाशी.

तू जुळवत राहा..
स्वप्नांचे आभासी बंध.
मी कदाचित विसरून जाईन.
जमवत राहीन अविरत,
तिरपागडे जमाखर्च ..
अस्तातल्या व्यस्त जगण्याचे !

© विशाल कुलकर्णी

No comments:

Post a Comment