Wednesday, July 17, 2019

सभोवार ओला ऋतू पावसाळी...


नभी दाटलेले थवे पाखरांचे, किती रंग आभाळभर व्यापलेले
सभोवार ओला ऋतू पावसाळी, निळ्या आसमंती उभे मेघ काळे

ढगांना पुन्हा आज पान्हा फुटावा, पुन्हा अंबराला सखी आठवावी
निघावेच आता सखीच्या दिशेने, प्रियाच्या मिठीने पृथा बावरावी

धरा बहरली आज कुठल्या खुशीने, कसे मेघ आतुर तिला भेटण्याला
किती गंध ओल्या जमीनीस यावे, किती रंग ओले तिच्या लाजण्याला

ललाटी कसे शोभते गंध हिरवे, झऱ्यांचे पदर रेशमी झुळझुळावे
नवी कंकणे वृक्षगर्भी फुलावी, पुन्हा कोवळे दंव सुखे पांघरावे

समीरा तुझ्या स्पर्शमात्रे रुजावे, कसे रोमरोमी शहारे फुलावे
सुखे भ्रमर गाईल पाऊसगाणे, पुन्हा त्या कळ्यांनी रूसावे हसावे

किती गालिचे गर्द हिरव्या ऋतूचे, कसे सोन पिवळे धरा वर्ख ल्याली
सख्या स्पर्श तो एक आता पुरेसा, निसर्गास ये पावसाने झळाळी

वृत्त : महानाग
(लगागा  लगागा लगागा लगागा, लगागा  लगागा लगागा लगागा)

© विशाल कुलकर्णी

No comments:

Post a Comment