Monday, September 2, 2019

गझल

माणसे मी वाचली तेव्हा जरासा हासलो
आरशाला मीच बहुदा आपलासा वाटलो

टाळले त्यांनीच जेव्हा ओळखीचे वागणे
मीच मजला यार तेव्हा मोकळासा भासलो

पुस्तकेही चाळलेली ज्ञान थोडे शोधण्या
राबलो रानात जेव्हा, तज्ञ खासा जाहलो

पंचगंगेच्या तिरावर नांदली माणूसकी
मी इथे सागरकिनारी कोरडासा वागलो

पावश्याची शीळ ऐकुन मेघही येती म्हणे
काल त्याला पाहुनी मी घाबरासा जाहलो

काय झाले थुंकले तोंडावरी माझ्याच ते?
मीच थोडा शरमलो अन बावळासा वाटलो

© विशाल कुलकर्णी


No comments:

Post a Comment