Monday, September 2, 2019

गझल



मेघ होवुन या धरेवर बरसलो मग
आसवांचे कढ़ होवुन साठलो मग

मी मलाही नेमका कळलोच नाही
आरशाला मीच तेव्हा हासलो मग

ते म्हणाले आज तू माणूस झाला
त्याच वेळी मी जरासा बाटलो मग

तोच रस्ता तीच वळणे तोच मीही
कोण जाणे मी कशावर भाळलो मग

चित्रगुप्ताच्या वहीवर शुन्य होते
त्यास बहुदा मी त्रिशंकू भासलो मग

अंबरावर थुंकलो अन हासलो मी
'त्यांस' ही त्यांच्यातला मी वाटलो मग

© विशाल कुलकर्णी



No comments:

Post a Comment