Monday, September 2, 2019

गझल


बरसले नभ अन भुईचे हरखले अंगांग आहे
अंबराचा अन धरेचा आगळा अनुराग आहे

कोंडलेले श्वास पुन्हा मोकळे झाले नव्याने
त्या दिशेला आजही बघ पेटलेली आग आहे

ती म्हणाली दूर जा तू भंगला विश्वास माझा
तो तसा दोषी नसावा मोजका सहभाग आहे

कावळे होती जमा पिंडास मानी हक्क त्यांचा
धर्म नामक जोखडाचा हा विनोदी भाग आहे

हासतो दुःखासवे मी यार तेही दोस्त आहे
अन सुखांच्या वल्गनांचा मज मनस्वी राग आहे

काल ती रस्त्यात दिसली बोट धरुनी लेकराचे
हासलो मी यार खोटे..., काय हा वैताग आहे?

चोर म्हणती साव म्हणती मी तसा निर्लज्ज आहे
लाख गुन्हे रोज करतो मी तरी बेदाग आहे

© विशाल कुलकर्णी
६-८-२०१९

No comments:

Post a Comment