Thursday, September 17, 2020
मुंबईचा पाऊस
मुंबईचा पाऊस आजकाल पावसासारखा येत नाही
क्लाऊड असतात पण त्यांना लाऊड होता येत नाही
पूर्वी पाऊस आला की ...,
खिडकीच्या कडेवर बेडूक दिसायचे
छताच्या पन्हाळ्याला
पावसाचे दोर लोंबायचे
अंगणातल्या पिंपळावर
हिरव्यागार पालवीचे वेल चढायचे
सरसरणाऱ्या वाऱ्याचे बोल परसात घुमायचे
पूर्वी पाऊस आला की..
संदुकीतल्या छत्र्या बाहेर यायच्या
छत्रीतल्या जोड्या मरीनड्राईव्हला दिसायच्या
दप्तराची ओझी आईबाबाच्या हाती देवून
पावसाच्या पाण्यात पिलांच्या टोळ्या रमायच्या,
पाऊस येतो आजही .., बदाबदा !
पण आजकाल कोसळत नाही
घरंगळतो बंद गिरण्यांच्या थंड भिंतीवरुन ,
पण का कोण जाणे...
... पूर्वीसारखा सोसवत नाही !
छत्र्या हरवल्यात ..
कधीच..., विंडचिटरच्या गर्दीत
आता पाऊससुद्धा ...
कॉन्क्रीटच्या जंगलात हरवतो
इथे वाराच कसाबसा ट्रॅफ़िकमधुन वाट काढतो
आता पावसाच्या डबऱ्यातुन उड्या मारत
मित्रांच्या अंगावर पाणी उडवणे नाही.
एकाच छत्रीत ...
पावसाला फसवत...
दोघांनी भिजणे तर नाहीच नाही.
आज पाऊस फक्त...
.... मिठीच्या नाल्यातून तुंबतो
गटारातून, सबवेतुन साचतो आणि रेल्वेरुळावर रूळतो...
क्वचित रुजतोही !
पण तरीही ईथला पाऊस जीवंत आहे
कारण आजही तो मुंबईकराच्या मनातून जागतो
आजही त्याच्या स्वप्नातून नांदतो
कधी आनंदाने तर कधी दुःखाने...
त्याच्या डोळ्यातून बरसतो...
पाऊस नाही बरसत आजकाल पावसासारखा
पण मुंबईतला पाऊसवेडा....
त्याला आजही पावसासारखाच समजतो.
© विशाल कुलकर्णी
१५-०६-२०१९
No comments:
Post a Comment